चुंचाळेत गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती
तपोभूमीत दिवसभर धार्मिक कार्यक्रम : चुंचाळे गावाला आले यात्रेचे स्वरूप
Thousands of devotees attended the Guru-Shishya death anniversary ceremony in Chunchale यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी येथे सोमवार, 20 मे रोजी वैशाख शुद्ध बारसला गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा या गुरू-शिष्यांचा एकाच तिथीवरील पुण्यतिथी सोहळा विविध धार्मिक विधीसह हजारों भक्तगण व शिष्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंचक्रोशीसह जिल्ह्यातून आलेल्या भक्तांच्या गर्दीने गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.
दुर्मीळ गुरु-शिष्य सोहळा
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील चुंचाळे येथे सुमारे 125 वर्षांपूर्वी श्री समर्थ सुकनाथ बाबांनी 12 वर्षे तप केला. त्यांची तपोभूमी म्हणून चुंचाळे गावाची ओळख आहे. श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचे समर्थ रघुनाथ बाबा हे पूत्र व शिष्य असून चुंचाळे त्यांचे जन्मस्थळही आहे. सुकनाथ बाबांचा नाथ सांप्रदायाच्या गादीचा वारसा त्यांनी चुंचाळे येथे पुढे सुरू ठेवला. 1979 वैशाख शुद्ध बारसला श्री समर्थ रघुनाथ बाबा समाधीस्थ झाले. श्री रघुनाथ बाबा व श्री वासुदेव बाबा या गुरू शिष्यांचे एकाच तिथीवरील आणि आगळावेगळा आणि दुर्मीळ गुरू-शिष्य पुण्यतिथी सोहळा सोमवारी भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सोमवारी पहाटे सहा वाजता आरती करत वासुदेव महाराज यांचे नवसारी गुजरातचे शिष्य दत्ता महाराज आणि चुंचाळेचे नगराज नाथ यांनी पूजा केली. त्यानंतर भजने, भारूड व महाआरती नंतर महाप्रसाद कार्यक्रम पार पडला.

भाविकांना महाप्रसाद वाटप
खापरावरच्या पुरणपोळ्या, आंब्याचा रस, मसाला रस्सी आणि भात हे महाप्रसादाचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी 10 क्विंटल गहू तर 11 क्विंटल आंबे वापरण्यात आले. रात्रभर गावातील महिलांनी जागरण करत चुलींवर खापरावरच्या पुरणपोळ्या तयार केल्या. पंचक्रोशीसह जिल्ह्यातील आलेल्या हजारो भाविकांच्या सेवेसाठी गावातील आबाल-वृद्धासह पुरुष व महिला व तरूण वर्ग न सांगता पुण्यतिथीच्या आदल्या दिवसापासून दोन दिवस राबत असतात. काय काम करायचे हे कुणीही सांगत नसतांना दिसेल ते काम करणे हे येथल्या लोकांचे एक वैशिष्ट्य आहे.




