बीडमध्ये भाजपाला मोठा धक्का : पंकजा मुंडे पराभूत ; बजरंग सोनवणेे विजयी
बीड : बीड लोकसभेत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे येथे विजयी झाले आहेत. बीडच्या निवडणुकीकडे राज्यासह देशाचे लक्ष बीड होते.
थोडक्यात झाला पराभव
बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण 2004 वगळता गेल्या आठ निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपने सत्ता मिळवली होती. 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांना भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे खासदार झाल्या. 2014 च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास सात लाखांची आघाडी होती मात्र 2019 मध्ये एक लाख 68 हजारांची आघाडी मिळाल्याचं चित्र होतं. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला असून, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आहे.

पहिल्या फेरीपासून सोनवणे आघाडीवर
मराठा आरक्षण, मनोज जरांगे फॅक्टर, राष्ट्रवादीतील फूट या कारणांमुळे बीडची निवडणूक अत्यंत चर्चेत राहिली. मतमोजणीदरम्यान शेवटच्या षटकात सामना बरोबरीत सुटावा आणि सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाला लागावा अशीच परिस्थिती बीडमधील लोकसभेच्या निवडणूक निकालात दिसून आली. पहिल्या फेरीपासून पुढील काही फेरीपर्यंत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. मात्र 5 ते 10 हजारांच्या फरकावर सुरू असलेल्या फेर्यामुळे येथील मतदारसंघात अत्यंत चुरस निर्माण झाली होती. उमेदवारांची धाकधूक आणि कार्यकर्त्यांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली, ती शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत कायम राहिली.
अवघ्या काही हजार मतांनी विजय
बजरंग सोनवणे यांना 32 व्या फेरीअखेर 6 लाख 81 हजार 574 मतं मिळाली आहेत. तर, पंकजा यांना 6 लाख 74 हजार 984 मतं मिळाली असून सहा हजार 585 मतांनी सोनवणे येथे विजयी झाले आहेत.
फेरमतदानाची मागणी
बीडमधील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदार संघात फेर मतदान करण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.




