भुसावळ पालिका वटपौर्णिमेला दहा हजार वृक्षांची लागवड करणार

जलशुद्धीकरण केंद्र आवारात लावली शंभर झाडे 


भुसावळ : शहरातील वाढत्या तापमानामुळे पालिकेच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण केले जात आहे. मंगळवार, 11 जून रोजी शहरातील जलशुध्दीकरण केंद्र परिसरात 100 वृक्ष लावण्यात आले तर शुक्रवार, 21 जूनला वटपौर्णिमेच्या दिवशी 10 हजार वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी पालिकेच्या कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे.

एकाच वेळी लावली शंभर झाडे
यंदा शहरातील तापमानाने 47 अंश गाठल्याने भुसावळकर वाढत्या तापमानाने हैराण झाले. दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या तापमानावर पर्याय म्हणून पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक विभाग प्रमुखाने स्वखर्चाने वृक्ष आणून लावायचे नियोजन मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवार, 11 रोजी पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. मुख्याधिकारी वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली ही वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. पहिल्या टप्यात पालिकेच्या सर्वच विभाग प्रमुख व कर्मचार्‍यांनी 100 वृक्ष लावले. यावेळी जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत जेसीबी मशीनद्वारे खड्डे करून त्यात 10 फूट उंचीची झाडे लावण्यात आली. विविध प्रकारची ही झाडे होती. शहरातील विविध भागातील मोकळ्या जागेत सुध्दा पालिकेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यासाठी मोकळ्या जागांची पहाणी केली जात आहे.वृक्ष संवर्धन समिती आणि पालिकेच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण केले जात आहे.


प्रत्येक नागरिकांनी एक वृक्ष लावा
शहरातील प्रत्येक नागरिकांनी एक तरी वृक्ष लावावा आणि शहर हरित करावे, असे आवाहन मुख्याधिकारी वाघमोडे व वृक्ष मित्र व पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना पाटील यांनी केले आहे. दिवसेंदिवस वाढणारे तापमानामुळे यंदा वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केल्यास पुढच्या वर्षी निश्चितच तापमानाचा पारा एक अंशाने तरी कमी होऊ शकणार आहे.

पालिका करणार नर्सरी
वृक्षारोपणासाठी पालिकेतर्फे यंदा नर्सरी तयार केली जात आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी पालिकेच्या नर्सरीतून रोपे तयार होतील व त्याची लागवड केली जाणार आहे. भुसावळकरांनी सुध्दा वृक्षारोपणाला पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी वाघमोडे यांनी केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !