बोगस बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करा : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन : भरारी पथकाची मागणी
यावल : यावल शहरातील आश्रय फाउंडेशन, भाजपा वैद्यकीय आघाडी व शेतकर्यांच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन शुक्रवारी दुपारी जळगाव जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावल येथील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.कुंदन फेगडे, डॉ.सुनील पाटील, उदयभान पाटील यांनी शुक्रवारी जळगाव जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात गुण नियंत्रण अधिकारी विकास बोरसे यांना निवेदन दिले.
भरारी पथक नियुक्त करण्याची मागणी
निवेदनाचा आशय असा की, जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली असून शेतकर्यांनी खरीपच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे. बर्याच ठिकाणी रोप उगवले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. याबाबत कंपन्यांवर व विक्रेत्यांवर कारवाई होत नाही आणि शेतकरी भरडला जातोय. जिल्हा कृषी विभागाकडून बोगस बियाणे कंपनी व विक्रेत्यांवर कारवाई करून भरारी पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.





