वरणगाव सेंट्रल बँकेत बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिला जखमी
सुरक्षा रक्षकाकडून बंदुकीचे लॉक काढताना दुर्घटना ; नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून डबल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरूष जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकाकडे असलेली डबल बोअरची बंदुक (रायफल) लॉक झाल्यानंतर हा लॉक काढताना ट्रीगरवर बोट ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर जखमींच्या नातेवाईकांनी धाव घेत संताप व्यक्त केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला अज्ञात स्थळी पोलिसांनी हलवले.
लॉक काढताना दुर्घटना
प्राथमिक समजलेल्या माहितीनुसार, वरणगावच्या सेंट्रल बँकेतील सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी (तापी नगर, भुसावळ) यांच्याकडे असलेली बंदुक लॉक झाली व हे लॉक काढण्याच्या प्रयत्नात त्यांचे ट्रीगरवर बोट ठेवले गेल्यानंतर एक गोळी सुटून ती त्यांच्या शेजारी असलेल्या प्रमिला वसंत लोहार (तळवेल), शोभा प्रकाश माळी (वरणगाव) व कलाबाई चौधरी (वरणगाव) व राधेश्याम छबीलदास जैस्वाल (वरणगाव) यांच्या पायाला लागल्याने बँकेत प्रचंड खळबळ उडाली. पाहता-पाहता गावात ही वार्ता पसरताच शेकडो नागरीकांनी बँकेकडे धाव घेतली.
पोलिसांनी घेतली धाव
वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार सुनील वाणी, राहुल येवले, शेळके, कुलकर्णी आदींनीही धाव घेत जमावाला बाजूला करीत जखमींना हलवण्याकामी सहकार्य केले. नलू इंगळे (मेंबर) यांनी जखमींना उपचारार्थ हलवण्याकामी सहकार्य केले.
बँकेत व्यवहार ठप्प
गोळीबारानंतर बँकेतील व्यवहार ठप्प झाले असून पोलिसांकडून पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षा रक्षक लालचंद चौधरी यांना नागरीकांच्या रोषानंतर पोलिसांनी सुरक्षीतस्थळी हलवले आहे.