यावलच्या सुतगिरणीच्या 7/12 वर नगरपालिकेचा बोजा : बेकायदेशीर खरेदीची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
यावल : शहरातील जे.टी.महाजन या सूतगिणीच्या 7/12 वर नगरपालिकेचा बोजा असतांना सुतगिरणीची विक्री झाली व सुतगिरणीचे दुय्यम निबंधकांनी बेकायदेशीररित्या खरेदीखत केले. या खरेदी खताला रद्द करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जिल्हाधिकारी कार्यालयात यावलचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अतुल पाटील यांनी केली आहे. कोट्यवधी रुपयांची थकबाकी असतांना खरेदी झाली कशी ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
पालिकेने बसवला बोजा
जिल्हाधिकारी कार्यालयात यावलचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, यावल येथील जे. टी. महाजन सहकारी सूतगिरणीकडे यावल नगरपरिषदेच्या कराची रक्कम गेल्या अनेक वर्षापासून थकीत होती. अनेकदा नगरपरिषदेने या करासंदर्भातील नोटीस देखील दिली. रक्कम वसूल होत नसल्याने व कर रक्कम वाढत असल्याने यावल नगरपरिषदेने जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणी यांच्या मालकीच्या सर्व मालमत्तेवर थकीत रक्कमेचा बोजा बसवला होता.

नाहरकत दिले नसताना नोंदवले खरेदीखत
सुत गिरणीकडे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचेदेखील कर्ज होते व जिल्हा बँकेनेदेखील बोजा बसवला होता. बँकेने सुतगिरणी ताब्यात घेऊन कालांतराने तिला विक्रीस काढले व सूतगिरणी शैलेश प्रभाकर खाचणे (रा. फैजपूर) यांनी 6 सप्टेंबर 2023 रोजी पाच कोटी 85 लक्ष रुपयात खरेदी केली आहे. वास्तविक पाहता कोणतीही मालमत्ता खरेदी करत असतांना मालमत्तेच्या सातबार्यावर बोजा कमी केल्याशिवाय खरेदीखत नोंदवता येत नाही किंवा बोजा असलेला संस्थेकडून नाहरत दाखला तरी घ्यावा लागतो व थकीत रकमेच्या पाच टक्के इतकी रक्कम मुद्राकं शुल्क भरून खरेदीखत करावे लागते. मात्र, सदर खरेदीखत करतांना त्यात कुठलीही नाहरकत प्रमाणपत्र नगरपरिषद यावल यांनी दिले नसतांना खरेदी खत नोंदविण्यात आले आहे. सदर खरेदीखत बेकायदेशीर असून ते रद्द करावे व दोेषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.
सध्या साडेतीन कोटी कर थकीत
सदर सुत गिरणीकडे मार्च 2024 अखेरपर्यंत नगरपरिषदेचे तीन कोटी 54 लाख 632 हजार 590 रुपये इतकी थकबाकी आहे. दुय्यम निबंधक, यावल यांनी नगरपरिषद यांचा बोजा असतांनादेखील त्यांना विचारात न घेत व नाहरकत प्रमाणपत्र न घेता परस्पर खरेदी खत केल्यामुळे नगरपरिषदेच्या थकबाकी वसुली करण्यास बाधा निर्माण झाली आहे.
या गटांवर आहे बोजा
जे.टी.महाजन सूतगिरणीकडे कराची रक्कम थकल्यामुळे या सूतगिरणीच्या गट क्रमांक 2130, 2131 व 2132 सह इतर मालमत्तेवर सन 2015 – 2016 पर्यंतची कराची रक्कम एकूण 53 लाख 68 हजार 070 रुपये व भाडे करारानुसार गिरणी दिल्यावर लावण्यात आलेला कर 14 जुन 2012 ते 31 मार्च 2013 तसेच 1 एप्रिल 2013 ते 14 जून 2013 चे बिल एकूण 51 लाख 82 हजार 148 अशी एकूण रक्कम एक कोटी पाच लाख 50 हजार 218 रुपयांचा बोजा बसवला होता.
न्यायालयात धाव घेणार
कराची रक्कम वसूल झाल्यास यावल नगरपालिकेमधून निवृत्ती झालेले कर्मचारी, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, सफाई कामगार यांची थकीत असलेली ग्रॅज्युटी, वेतन आयोगाचा फरक आदी रक्कम देणे सुलभ होणार आहे व उर्वरित रकमेत विविध विकासकामे देखील करता येणार आहेत. कराची रक्कम वसूल होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याची वाट बघू व वेळ पडल्यास न्यायालयीन लढाई लढण्याची आपली तयारी असल्याचे यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील म्हणाले.




