पंकजा मुंडे, परिणय फुके यांची विधान परिषदेवर वर्णी
Pankaja Munde, Parinay Phuke appointed to Legislative Council मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले असून भाजपाने विधान परिषदेतील पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पंकजा मुंडे यांच्या सोबतच सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांच्या नावाचा देखील यात समावेश आहे.
भाजपाने केली नावे जाहीर
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणार्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात होणार्या मंत्रिमंडळात विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान मिळण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.

भाजपाच्या वाट्याला पाच जागा
11 जागांसाठी होणार्या या विधान परिषदेत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वाटेला पाच जागा येणार आहेत. यामध्ये पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. या आधी देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेवर करण्यात आली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना संधी डावलण्यात आली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे उमेदवारी देण्यात आली आहे.




