ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करा : आमदार एकनाथराव खडसे
आमदार एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे मागणी
मुक्ताईनगर : जळगाव जिल्हयात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्वारी पिकाचे शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. आमदार खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी पिकाचे शासकीय हमी भाव केंद्र सुरू नसल्याने केंद्राअभावी शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांचे हमी भाव केंद्र नसल्याने होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी पिकाचे हमी भाव केंद्र सुरू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली अथवा करण्यात येत आहे? याबाबत त्यांनी विचारणा केली. लवकरात-लवकर कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी हमी भाव केंद्र सुरू करून शेतकर्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली.
लवकरच सुरू होणार केंद्र
या प्रश्नाला अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी पिकाचे शासकीय हमी भाव केंद्र सुरू नसल्याने केंद्रा अभावी शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याची बाब खरी आहे. राज्य शासनाने 15 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास सादर केलेल्या ज्वारी खरेदीच्या आराखड्यास केंद्र शासनाकडून 27 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये मंजुरी प्राप्त झाली आहे. केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने 9 मे 2024 च्या पत्रान्वये अभिकर्ता संस्थांना ज्वारी खरेदीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्या करता उद्दिष्टे विभागून दिली आहेत. जळगाव जिल्ह्यात 18 खरेदी केंद्रावर एकूण तीन हजार 494 शेतकर्यांनी नोंदणी केली आहे. आजअखेर एकूण 13 हजार 550 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली असून आणखी मागणी असल्यास माहिती घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.





