पाडळसे ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या कामाची चौकशीची मागणी
यावल : यावल तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगात झालेल्या कामांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन यावल पंचायत समितीमध्ये पाडळसे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले आहे. यापूर्वी देखील निवेदन दिले होते मात्र त्याची चौकशी झाली नाही म्हणून पुन्हा पंचायत समितीमध्ये सोमवारी निवेदन देण्यात आले.
दुसर्यांदा दिले निवेदन
यावल येथील पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अलका रघुनाथ सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुदेश कडू बाविस्कर, पुनम पाटील, तुषार भोई,पांडुरंग कोळी यांनी निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की, पाडळसे ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाच्या चौकशीसाठी 19 जून व 27 जून रोजी निवेदन सादर करण्यात आले मात्र अद्यापपावेतो या कामाची चौकशी झाली नाही. 15 वा वित्त आयोगाच्या कामातील झालेल्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशीसाठी समिती गठित करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





