यावलला हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड

पुन्हा गुन्हा करू नका : सहा.पोलीस अधीक्षका अन्नपुर्णा सिंग


यावल : यावल पोलीस ठाण्यात बुधवारी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या हिस्ट्रीशीटर व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. सर्वांना त्या म्हणाल्या की, सध्या तुम्ही जामिनावर बाहेर असलातरी तुमच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे लक्ष आहे. तुमच्या हातून पुन्हा गुन्हा घडणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यावी व पोलीस ज्यावेळेस बोलवतील त्यावेळेस पोलीस ठाण्यात हजर राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

सात हिस्ट्रीशीटरची ओळख परेड
यावल पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात हिस्ट्रीशीटर (दीर्घ गुन्हेगारी नोंद असलेली व्यक्ती)आणि 22 रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा 29 जणांना बोलवण्यात आले. या सर्वांची ओळख परेड फैजपूर उपभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी घेतली व त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, न्यायालयातील प्रक्रिया व हल्ली हे सर्व गुन्हेगार काय करत आहे याची माहिती जाणुन घेतली. या सर्वांना त्यांनी सुचित केले की, तुम्ही जरी जामिनावर बाहेर असले तरी तुमच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. जोपर्यंत आपल्यावर प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. तोपर्यंत तुमच्या हातून दुसरा गुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार वासुदेव मराठे, हवालदार सुशील घुगे सह आदींची उपस्थिती होती.


हद्दपार व एमपीडीए प्रस्तावाच्या सूचना
शहर व तालुक्यात ज्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असेल अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या सर्व गुन्ह्यांची माहिती संकलीत करून त्यांच्या संदर्भात हद्दपार व एमपीडीए प्रस्ताव तयार करावा, अशा सुचना प्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांनी यावल पोलीस निरीक्षकांना दिल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !