विज्ञान शाखेसाठी प्रयोग सहाय्यक पद मंजूर करा
जुक्टो संघटनेचे शिक्षक आमदारांना निवेदन
भुसावळ : गेल्या अनेक वर्षापासून अंशतः तत्त्वावर चालणार्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश घेतले आहे. जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांच्या अंशतःअनुदानीत तुकड्या कार्यरत असून अशा तुकड्यांवर कनिष्ठ प्राध्यापक अतिशय कठीण परिस्थितीत आपली सेवा बजावत आहे. हे काम करीत असताना त्या कनिष्ठ प्राध्यापकांनाच प्रयोग सहाय्यकाचे काम करावे लागते. शासनाने अनुदान तत्त्वावरती ज्या पद्धतीने प्रयोग सहायकांची पद निर्गमित केली त्याच पद्धतीने अंशत: अनुदानित तत्वावरील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेसाठी प्रयोग सहाय्यक पद मंजूर करावे व विज्ञान शाखेच्या प्राध्यापकांच्या वरती जो ताण तणाव निर्माण होतो तो कमी करावा तसेच शासनाने प्रयोग सहाय्यक पद निर्माण करून कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकड्यांना कनिष्ठ प्राध्यापकांच्या बरोबरच प्रयोग सहाय्यक पद मंजूर करावी अशी मागणी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने केली आहे. आठही विभागातील विधान परिषद सदस्य किशोर दराडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार किरण सरनाईक, आमदार विक्रम काळे, आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
सर्व परिषदेतील आमदारांनी राज्यातील शालेय शिक्षण विभागाला ही पदे निर्माण करण्यासाठी आग्रहाची मागणी करावी, अशी मागणी जुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, सचिव प्रा.सुनील सोनार, कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, प्रा.सुनील पाटील, जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र तायडे, प्रा.डी.डी.पाटील, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.राजेश बडगुजर यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे.





