बोदवडला 11 तारखेच्या अजेंड्यावर 16 तारखेला सह्या घेण्याचा प्रकार

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार


बोदवड : बोदवड शहरात एका प्रभागाची पोटनिवडणूक असल्याने आचारसंहिता सुरू असताना गत 11 जुलै या तारखेचा अजेंडा 16 तारखेला नगरसेवकांना देऊन त्यांच्याकडून सह्या घेण्याचा प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बोदवड नगराध्यक्षांसह पालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

पालिकेच्या भोंगळ कारभाराबाबत तक्रार
निवेदनाचा आशय असा की, नगरपंचायत कार्यालयात अनागोंदी कारभार आहे. नगराध्यक्ष यांच्या सहीचा मागील तारखेचा अजेंडा प्रकाशित करुन तो नगरसेवकांकडे सह्यांकरीता पाठवण्यात आला. त्यातील तारखांचा घोळ बघितल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना ही सभा बोगस होणार असल्याची कल्पना आल्यामुळे त्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. कोणतीही चर्चा न करता मागील तारखेत सभा दाखवणे हा अपराध असल्याने त्याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी यांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वारंवार सांगितले आहे. सद्यस्थितीत बोदवड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारकरीता पोट निवडणूक घोषित झाली आहे. त्याबाबतचा निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध झाला असतांना निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अशा प्रकारचे कृत्य सुरू आहे. या संदर्भात जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून याबाबत गांर्भीयाने दखल घेवून सखोल चौकशी करुन संबंधीत अधिकारी यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली आहे. या अनागोंदी कारभारा विषयी आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तारीख चुकल्याने जुन्या प्रिंटवर सह्या घेण्यात आली, रीव्हाईज प्रिंट काढणे बाकी असल्याचे ते म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !