भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 11 वारकर्‍यांची सायकलवारी


भुसावळ : भुसावळ शहरातील भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 11 वारकरी सदस्यांनी यंदा भुसावळ ते पंढरपूर ही सायकल वारी पूर्ण केली. भुसावळहुन दोन्ही बाजूंनी 940 किलोमीटरचे अंतर सायकल चालवून त्यांनी पंढरपूर गाठले. हे सायकलस्वार विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेवून मंगळवारी पहाटे शहरात परतले. सतत चार दिवस उन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता या 11 सायकलवीरांनी भुसावळहुन जामनेर, पहूरमार्गे बीड व तेथून सोलापूरमार्गे पंढरपूर गाठले.

आगळी-वेगळी भक्तीचा वाट
भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सायकलपटूंनी एक आगळीवेगळी भक्तीची वाट संपूर्ण भुसावळ शहरासाठी व जिल्ह्यासाठी दाखवून दिली. औचित्य होते पंढरपुरात विठ्ठल रखूमाईचे दर्शनाचे. या सर्व सायकलपटूंनी यावेळी ठरवलं की कुठल्याही वाहनाने न जाता आपण सायकलने ही पंढरपूरची वारी करायची. भुसावळहुन दोन्ही बाजूंनी 940 किलोमीटरचे अंतर सायकल चालवून त्यांनी पंढरपूर व तेथून भुसावळ गाठले. यासाठी सतत चार दिवस उन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता या 11 सायकलवीरांनी भुसावळहुन निघाल्यानंतर जामनेर, पहूरमार्गे बीड व तेथून सोलापूरमार्गे पंढरपूर गाठले. रस्त्यात ठिकठिकाणी असंख्य नागरिकांनी या सायकलवारीचे विशेष कौतुक केले व त्यांच्या ठायी असलेला भक्तिभाव बघून त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. पंढरपुरात दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या इतर सायकलपटूसोबत गोल रिंगण करून जणू हा सायकलविरांचा महामेळावा आहे असे चित्र त्याठिकाणी निर्माण झाले.


असा झाला चार दिवसांचा प्रवास
भुसावळातील सायकलपटूंनी शनिवार, 13 जुलै रोजी सकाळी सहा वाजता शहरातील व्हीएम वॉर्डातील प्राचीन विठ्ठल रखुमाई मंदिरातून सायकल वारीचे प्रस्तान ठेवले. सायकल वारी रविवार, 14 जूलैला सायंकाळी पंढरपूरला पोचली. तेथे मुक्काम करीत सोमवारी दर्शन केल्यानंतर सायकलपटू पून्हा भुसावळकडे निघाले. ते मंगळवार, 16 रोजी पहाटे तीन वाजता भुसावळात पोहोचले.

यांचा होता सायकलवारीत सहभाग
सायकल वारीमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांच्या नेतृत्वात विद्याधर इंगळे, मधुकर इंगळे, गजानन पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, युवराज सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, रवीकांत पवार, जगदीश रेहपाडे, सोमनाथ जाधव यांनी या सायकल वारीमध्ये यशस्वीपणे सहभाग नोंदविला. सायकलवारीसाठी 15 दिवस आधीपासूनच नियोजन सुरू होते.

उत्कृष्ठ नियोजनाने वारी पूर्ण झाली
या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी दोन सदस्यांकडे सोपविण्यात आली होती. लांब पल्ल्याच्या अंतरात कुठे थांबायचे, कुठे नाश्ता, चहा व जेवणाची व्यवस्था करायची आदी सगळ्या गोष्टींचा समावेश होता. त्यानंतर पंढरपुरात दाखल झाल्यानंतर निवासाची व्यवस्था कुठे असेल व दर्शनाची व्यवस्था कशी असेल याची देखील जबाबदारी त्यांनी पार पाडली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !