दीपनगरात सीएसआर निधीत भेदभाव : आमदारांचे ठिय्या आंदोलन
प्रकल्प संचालकांच्या ठोस आश्वासनानंतर सहा तासांनी आंदोलन मागे
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राने पाच किलोमीटरचे बंधन झुगारून सीएसआर (सामाजिक दायीत्व निधी) निधीतून आठ किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये नियमबाह्य कामे केली. शिवाय मृत प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून सेवेत घेण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप करत आमदार संजय सावकारे यांनी परिसरातील सरपंच, प्रकल्पग्रस्त व पदाधिकार्यांसह गुरुवारी दुपारी चार वाजेपासून मुख्य अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मांडला. सहा तासांनंतर म्हणजे रात्री सुमारे 10 वाजता प्रकल्प संचालकांच्या ठोस आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या मागण्यांसाठी आंदोलन
आमदार सावकारे यांनी गुरुवारी दुपारी चार वाजता दीपनगर केंद्र गाठले. प्रकल्पाच्या पाच किमी परिघातील प्रकल्पग्रस्त बाधीत गावांमध्ये सीएसआर निधी वापरून दीपनगर प्रकल्प तालुक्यातील प्रकल्पग्रस्त आणि बाधित गावांवर अन्याय करीत असल्याचा मुद्दा आमदार सावकारे यांनी मुंबई येथे संचालकांना संपर्क साधून मांडला. 90 प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना दीपनगर प्रकल्पात प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून सेवेत घ्यावे, रावेर तालुक्यातील गावांना ज्या नियमानुसार दीपनगर केंद्राने सीएसआर निधी दिला आहे, त्याच नियमानुसार तो भुसावळ तालुक्यातील हतनूर, सावतर निंभोरा, खडका, सुसरी, पिंपळगाव आदी गावांना द्यावा, अशी मागणी आमदारांनी केली. गरजेची कामे, सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र दीपनगर केंद्राने हा निधी अंतराचे बंधन झुगारून भुसावळ तालुक्याबाहेर रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये दिला. याबाबत आमदार सावकारे यांनी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना जाब विचारला.

प्रकल्प संचालकांशी यशस्वी चर्चा
दीपनगर प्रकल्प तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व बाधीत गावांवर अन्याय करीत आहे हा मुद्दा आमदारांनी मुंबई येथे संचालकांशी संपर्क साधून मांडला. यानंतर बाधीत गावांमध्ये सांस्कृतिक भवन बांधून देणे, प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेत घेण्यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रात्री दहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.




