वरणगावात एसआरपीएफ केंद्राला मंत्री मंडळाची मंजुरी

यापूर्वी आमदार रोहित पवारांनी पळवले होते केंद्र : आमदारांच्या पाठपुराव्याला यश


Cabinet approves SRPF center at Warangaon भुसावळ : आघाडीच्या सत्ता काळात राष्ट्रवादीचे आमदार रोहितपवार यांच्या जामखेड मतदार संघातील कुडसगाव येथे वरणगावात मंजूर असलेले राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र हलवण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या मात्र 5 जुलै रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत वरणगावात राज्य राखीव पोलीस दलाचे नवीन गटनिर्माण करण्यास पुन्हा मंजुरी देण्यात आली. यासाठी एक हजार 380 नवीन पदांसह 152 कोटी 26 लाख रुपये अनावर्ती व 63कोटी 69 लाखांच्या आवर्ती खर्चाला मंजुरी मिळाली आहे.

वरणगावातील केंद्र आमदार रोहित पवारांनी पळवले
वरणगाव येथे युती सरकारच्या काळात 1996 पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले. हे केंद्र तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असल्याने 1999 मध्ये राज्य राखीव बल गटाची स्थापना झाली. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या केंद्राचे भूमिपूजन केले मात्र हे केंद्र रखडले. यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये येथे राज्य राखीव पोलीस बल गट 19 च्या केंद्राला मान्यता मिळाली. मात्र विधानसभा निवडणूक होऊन राज्यात महाआघाडीचे सरकार आले. या काळात जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीनगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे केंद्र पळवले.

आमदारांच्या पाठपुराव्याने पुन्हा मंजुरी
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी विद्यमान युती सरकारकडे पुन्हा केंद्रासाठी आग्रह धरल्याने 5 जुलै रोजी मंत्री मंडळ बैठकीत वरणगाव येथे पुन्हा राज्य राखीव पोलीस बलाची नवीन तुकडी स्थापण्यास मंजुरी मिळाली आहे.

अन्याय दूर झाला : आमदार संजय सावकारे
भुसावळ मतदार संघातील मंजूर केंद्र केवळ राजकारण करून हलवण्यात आले मात्र आम्ही राजकारण न करता नवीन केंद्राला मंत्री मंडळाची मंजुरी मिळवली. यासंदर्भातील शासन आदेश लवकरच निघणार आहे. भुसावळ मतदारसंघासह जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी असेल, असे आमदार संजय सावकारे म्हणाले.


कॉपी करू नका.