यावल शहरात पेहरन उत्सवानिमित्त मिरवणूक
यावल : यावल शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी आणलेल्या बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांच्या पेहरन अर्थात तब्बरूक ( पवित्र वस्त्र ) यांची स्वातंत्र्यपूर्व काळापासून यावल येथे मिरवणूक काढली जाते. या पवित्र वस्त्रांना सजवलेल्या डोलीत ठेवले जाते व दरवर्षी त्यांची मिरवणूक काढण्यात येते. यास पेहरण ए शरीफ उत्सव म्हणतात. रविवारी शहरात डांगपूरा मोेहल्ला समितीकडून उत्सव साजरा करण्यात आला.
राज्या-परराज्यातील भाविक सहभाग
यात धार्मिक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्यात आली. शहरातील डांगपुरा येथून सायंकाळी मिरवणुकीला सुरवात झाली. या उत्सवात हिंदू-मुस्लिम सह सर्वधर्मीय बांधव एकत्र आले होते. यातून एकात्मतेचे दर्शन घडले तर मिरवणुकीपुर्वी अनेकांनी मानलेले नवसदेखील फेडले. येथे जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बर्हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक दाखल झाले. पेहरन शरीफ मिरवणुक सुदर्शन चौकात दाखल झाल्यावर येथे विविध मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीत डोली खालून निघत अनेकांनी नवस मागितले. संपूर्ण उत्सव शांततेत साजरा होण्यासाठी उत्सव समिती अध्यक्ष शेख फारूख शेख मुन्शी, उमर अली कच्छी, खजिनदार हाजी रशीद खान बशीर खान, सल्लागार करीम मण्यार यांनी परिश्रम घेतले. उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.





