भुसावळ शहरावर आता तिसर्‍या डोळ्याची नजर : चार कोटींचा निधी मंजूर

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यानंतर डीपीडीसीतून निधी मंजूर


Third eye on Bhusawal city now : Fund of four crores approved भुसावळ : भुसावळचे आमदार सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून चार कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाल्यानंतर शहरात सीसीटीव्ही लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 442 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. त्यापैकी 319 कॅमेरे बाजारपेठ, तर 123 कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवले जाणार आहेत.

गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार मोठी मदत
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, 360 अंश व नाईट मोडवर सुस्पष्ट चित्रीकरण हे नवीन कॅमेर्‍यांचे वैशिष्ट्य असणार आहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठे सहायकारी ठरतील, असे पोलीस उपअधीक्षककृष्णात पिंगळे म्हणाले.

शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा मार्ग मोकळा : आमदार सावकारे
भुसावळ हे शहर मिश्र लोकवस्तीचे शहर आहे. शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी वैयक्तिकरित्या पाठपुरावा सुरू होता. गत काळात बजेट वाढल्याने त्याबाबत मंत्रालयातून तांत्रिक मान्यता आणावी लागली व नंतर आचारसंहिता लागल्याने प्रशासकीय मान्यता रखडली होती मात्र आता भुसावळ शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन मधून चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिला सुरक्षा, पोलिसांचा गुन्हे तपास, गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंध तसेच कायदा व सुव्यवस्था प्रस्थापीत करण्यात सीसीटीव्हीची भूमिका महत्त्वाची असेल, असे
आमदार संजय सावकारे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.

या जागी बसणार अत्याधूनिक कॅमेरे
शहर पोलीस ठाणे हद्दीतील हंबर्डीकर चौक, ओकारेश्वर मंदिर, महाराणा प्रताप चौक, न्यायालय परीसर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, पोलिस वसाहत, सेंट अलॉयसेस हायस्कूल, पंचमुखी हनुमान मंदिर, वाल्मीक नगर, कुंभारवाडा, मरीमाता मंदिर, आराधना कॉलनी, लोणारी हॉल, भोई नगर, स्वामी विहार दत्त नगर, कोटेचा कॉलेज, कोटेचा स्कूल, पालिका परीसर, सेंट्रल रेल्वे स्कूल, नारखेडे विद्यालय, राहुल नगर, ताप्ती क्लब, रेल्वेने नॉर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर भागात सीसीटीव्ही लावण्यात येतील.

बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील खडका चौफुली, रजा टॉवर, बसस्थानक, नाहाटा चौक, शिवाजी नगर चौक, वांजोळा रोड, मातृभूमी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमरदीप चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, स्टेशन चौकी, पांडुरंग टॉकीज, एसबीआय शाखा, वाल्मीक नगर चौक, मोटुमल चौक, दीनदयाल नगर, आनंद नगर (एसबीआय), सिंधी कॉलनी गेट, पुंडलिक बर्हाटे शाळा, जामनेर रोड, श्रद्धा नगर चौक, डीवायएसपी कार्यालय, पंधरा बंगला, बुद्ध विहार इत्यादी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.

 


कॉपी करू नका.