भुसावळ पालिकेकडून अनधिकृत फलकांसह होर्डींग्जवर कारवाई

थकबाकीदारांना अल्टीमेटम ः पथक माघारी हटताच यावल रोडवर पुन्हा अतिक्रमण


Action by Bhusawal Municipality on hoardings with unauthorized boards भुसावळ :मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डींग्ज कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू तर 75 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. राज्यभरातील अनधिकृत होर्डींग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर शिंदे सरकारने या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर भुसाावळ पालिकेने मंगळवार 23 जुलै रोजी सकाळी शहरात अनधिकृत फलकांवर कारवाई केली. जेसीबी व कटरद्वारे 86 लहान फलक व 18 मोठे होर्डींग्ज जप्त करण्यात आले. दरम्यान, यावल रोडवर पथक धडकताच अतिक्रमण हटवले जाणार असल्याच्या भीतीने व्यावसायीकांची तारांबळ उडाली. अनधिकृत फलकांवर कारवाई करून पथक परतत नाही तोच अनधिकृत व्यावसायीकांनी यावल रोडवर पुन्हा आपला डेरा जमवला.

या भागात झाली कारवाई
भुसावळ शहरातील यावल रोडवरील गांधी पुतळा परिसर, तापी रोड, हंबर्डीकर चौक, बाजारपेठ पोलीस ठाणे, जामनेर रोडवरील वाल्मिक चौक, अष्टभुजा देवी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज संकूल परिसर, नाहाटा महाविद्यालय आदी परिसरात मंगळवारी पालिकेने कारवाई केली.

चार एजन्सी धारकांना अल्टीमेटम
भुसावळ पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके, आस्थापना प्रमुख अनिल आहुजा, अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे, संकिर्ण विभाग प्रमुख विष्णू राठोड, लिपिक अनिल भाकरे, गोपाळ पाली, राजेंद्र चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. शहरातील 17 होर्डींग एजन्सीपैकी चार एजन्सीचालकांकडे पालिकेचे 27 लाख 814 रुपये थकीत आहे. या थकीत होर्डींगवरही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या नेत्यांचे बॅनर लावणार्‍यांवर आता पालिकेने थेट गुन्हे दाखल करण्याची अपेक्षा आहे.

ऑडीट नसलेले 18 होर्डींग पालिकेने हटवले
भुसावळ शहरात पालिकेने 17 एजन्सी नेमल्या असून त्यांच्याकडून 45 होर्डींगला परवानगी आहे मात्र शहरातील विविध मार्गांवर परस्पर परवानगी न घेता बॅनर व लोखंडी सळईचे स्ट्रक्चरवर बॅनर लावून नेत्यांकडून चमकोगिरी केली जाते मात्र 61 होर्डींगपैकी चार एजन्सी धारकांच्या 24 होर्डींगचे ऑडीट नसल्याने 18 होर्डींग मंगळवारी काढले. उर्वरित होर्डींगही आठवडाभर चालणार्‍या कारवाईत हटवले जातील, असे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.