गिरडगावातून दुचाकीची चोरी : यावल पोलिसांनी दोघांना केली अटक


यावल : यावल तालुक्यातील गिरडगाव येथून मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन जणांना यावल पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली. दोघे मध्यप्रदेशातील रहिवासी असून त्यांच्याकडून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली. दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व संशयीताची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.

परप्रांतीय संशयीतांना अटक
गिरडगाव, ता.यावल येथील प्रशांत भीमराव पाटील यांची विना क्रमांकाची मोटरसायकल 17 जून रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी 19 जून रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन, सचिन पाटील, हरीश वेताळ, राहुल केदारे यांनी करत या गुन्ह्यात शिरपूर येथून राजेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला (36) व ईश्वरसिंग नुरबीनसिंग चावला (23, दोघे राहणार उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक केली. या दोघांनी मोटरसायकल चोरी करून भुसावळात बेवारस सोडली. ती बेवारस मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोघांना मंगळवारी यावल येथील न्यायालयात हजर केले असता येथील प्रथमवर्ग न्यायाधीश आर.एस. जगताप यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयीतांची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश महाजन करीत आहे.


कॉपी करू नका.