पुण्यात पावसाचा हाहाःकार : अनेक घरांमध्ये शिरले पाणी ; जनजीवन विस्कळीत


पुणे : जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पावसामुळे पुण्यासह शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये कमरेइतके पाणी साठले आहे. यात अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. बुधवारी रात्रीपासून शहरात 114 मिमी पावसाची नोंद झाली. हा तर ‘आयएमडी’च्या नोंदीमधील हा उच्चांकी दहावा पाऊस झाला आहे. वारजे येथील एका गोठ्यातील 14 जनावरे या पावसात दगावल्याची दुदैवी घटनाही घडली.

पुन्हा अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने पुढील काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात रेड अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी या भागातील शाळांना सुटी घोषित केली आहे.

अजित पवारांनी घेतला आढावा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात विविध भागांत जाऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे शहरातील विविध भागांत पुन्हा एकदा पाणी शिरण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ दिल्लीहून पुण्याकडे रवाना झाले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून मोहोळ हे पुण्यातील पावसाचा आढावा व वेळप्रसंगी मदत कशी करता येईल, या उद्देशाने त्यांनी दिल्लीतील कामे बाजूला ठेवत पुण्याकडे धाव घेतली आहे.

प्रसिद्ध भिडे पूल पाण्याखाली
गेल्या दोन दिवसांपासून तर पुणे शहर व घाटमाथ्यावर संततधार ते जोरदार पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात धरणसाठाही कमीच होता. पण दोन दिवसांतील पावसाने धरणेही भरून गेली. ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसला तरी, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, नदी, ओढे, नाले भरून वाहू लागले. खडकवासला धरणातूनही विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रसिध्द असणारा भिडे पूलही पाण्याखाली गेला.


कॉपी करू नका.