उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाचे वाटोळे : मनोज जरांगे-पाटील कडाडले


छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजोचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. भाजपाचे त्यांच्यामुळेच वाटोळो झाल्याचा दावा त्यांनी करीत खळबळ उडवून दिली आहे. आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेणार्‍या जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

तर आमच्या माता-भगिनी रस्त्यावर
जरांगे पाटील म्हणाले की, सध्या सरकारसोबत आमचा संपर्क शून्य आहे. जोपर्यंत सहन होते, तोपर्यंत सहन करू. नंतर सर्वकाही बाहेर काढू. 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान कितीही पाऊस किंवा पूर येऊ द्या आमच्या माताभगिनी रस्त्यांवर दिसतील, असे मनोज जरांगे म्हणाले.


छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा
मनोज जरांगे यांनी यावेळी मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा गेंडा म्हणून केला. ते म्हणाले, येवल्याच्या गेंड्याला काही फरक पडत नाही. प्रसाद लाड बोलत आहेत, पण फडणवीस त्यांना थांबवत नाहीत. दरेकरांच्या चकाट्या ऐकण्यास मला वेळ नाही.

फडणवीसांमुळे भाजपचे वाटोळे
फडणवीस हेच खरी सत्ता चालवत असून यामुळेच भाजपचे वाटोळे होत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. माझ्यावर टीका हा त्यांच्या अभिनयाचा भाग आहे. राणे साहेबांवर मी बोललो नाही त्यामुळे त्यांनी नीलेश व नीतेश या दोन्ही मुलांना समजून सांगावे. कारण, माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल. इतर नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांना माझ्याविरोधात मोहीम राबवण्याचे निर्देश दिल्याचेही ते म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !