नांदेडचा लाचखोर आरटीओ अधिकारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

ड्रायव्हिंग ट्रायलमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना कारवाई


Nanded’s bribe-taking RTO officer in Jalgaon ACB’s net जळगाव : ड्रायव्हींग स्कूलमधील फेल झालेल्या प्रशिक्षणार्थी चालकांना उत्तीर्ण करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची लाच स्वीकारताना नांदेड येथील सहा.मोटार वाहन निरीक्षक भूषण जवाहर राठोड (34) यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. एसीबीच्या कारवाईने नांदेड परिवहन विभागातील लाचखोर हादरले आहेत.

असे आहे लाच प्रकरण
नांदेड येथील गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये 22 वर्षीय तक्रारदार हे शिपाई आहेत मात्र या स्कूलमधील वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणार्‍या 20 प्रशिक्षणार्थी चालकांना ड्रायव्हिंग ट्रायलमध्ये नांदेडचे सहा.मोटार निरीक्षक भूषण राठोड याने फेल केले व उत्तीर्ण करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली व नऊ हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली. तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी अंती सापळा रचण्यात आला. नऊ हजारांची लाच स्वीकारताच सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भूषण जवाहर राठोड (34) यांना गुरुवारी अटक करण्यात आली. संशयीताविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.


कॉपी करू नका.