पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी रावेरात संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन

रावेरात जुना सावदा रस्त्यावरील नागझिरी नाल्यावर हवा पर्यायी रस्ता


रावेर : शहरातील जुन्या सावदा रोडवरील नागझरी नाल्यावर पर्यायी रस्ता करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी रावेरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली.

रस्त्याअभावी वाहनधारकांची गैरसोय
शहरातील जुन्या सावदा रोडवरील नागझिरी पुलाचे काम चार महिन्यांपासून सुरू आहे. वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफार्मरमुळे या कामात अडथळा येत आहे. यामुळे नाल्याचे पाणी काढण्यास व्यत्यय येत आहे. पालिकेने मे महिन्यात नालेसफाई केल्यामुळे तात्पुरता केलेला पर्यायी रस्ता बंद झाला. यामुळे नागरीक, शाळेतील विद्यार्थ्यांना दोन अडीच किलोमीटर अधिक अंतर फिरून जावे लागत आहे. या नाल्यावर पर्यायी रस्ता व्हावा यासाठी संघर्ष समितीतर्फे येथील रेल्वे स्थानक रोडवर समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या.

पर्यायी रस्त्याबाबत सकारात्मक आश्वासन
यावेळी बांधकाम विभागाचे अभियंता चौधरी, तायडे तसेच वीज वितरण कंपनीचे सुंदरानी यांनी ट्रान्सफार्मर हटविणे तसेच पर्यायी रस्त्याबाबत चर्चा केली. संबंधितांनी लवकरच पर्यायी रस्ता देण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. रावेरचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सचिन नवले, घनश्याम तांबे, पुरुषोत्तम पाटील आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

यांची आंदोलनात होती उपस्थिती
यावेळी डी.डी.वाणी, अ‍ॅड.योगेश गजरे, जे.जे.पाटील, दिलीप साबळे, विनोद तायडे, शेखर हंसकर, मुबारक तडवी, राजेंद्र चौधरी, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील, संदीप महाजन, रवींद्र पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले.


कॉपी करू नका.