खासदार संजय राऊत म्हणाले : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर खलनायक
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खलनायक असा उल्लेख करीत खळबळ उडवून दिली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी काही दिवसांपूर्वीच धक्कादायक दावा करताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजपने दबाव आणण्याचे म्हटले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी फडणवीसांनी पाठवलेल्या व्यक्तीचे नाव समित कदम असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर आता समित कदम यांनी पुढे येत त्यावेळी काय घडले होते, याबाबत खुलासा केला. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्याप्रकरणी भाष्य केले आहे.
फडणवीसांनी मध्यस्थी पाठवला
राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे. मी आरोप म्हणणार नाही तर खुलासा म्हणेल. कारण आरोप हवेत होत असतात. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थी पाठवला आणि त्या मध्यस्थीने अनिल देशमुख यांना सांगितले की, आम्ही तुम्हाला तीन अॅफिडेव्हीट देतो, त्या अॅफिडेव्हीट वर तुम्ही सह्या करा. त्यानंतर तुमच्यावर जी ईडी आणि सीबीआयची जी कारवाई होत आहे, त्यामधून आम्ही तुम्हाला वाचवू. तुम्हाला अटक होणार नाही. अशाप्रकरचा इशारा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने झाला”, असा दावा राऊतांनी केला आहे.

जे घाबरले ते भाजपमध्ये गेले
राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “हा सदगृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अनिल देशमुख यांना वारंवार भेटत राहिला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा असे अनिल देशमुखांना सांगण्यात आले होते. यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना वारंवार खलनायक म्हणतो. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राजकीय दबावाला जे झुकले नाही ते तुरुंगात गेले आमच्यासारखे आणि जे झुकले व घाबरले ते भाजपात गेले”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.




