शेती-माती झाडांशी निकोप दोस्ती करा


भुसावळ : आई मुलांसाठी संस्कार, जाणिवांचे बीज पेरून निघून जाते. पण तिचे अस्तित्व निरंतर टिकून असते. काळाची पावलं ओळखून ती चालायला शिकवते. आयुष्यात माय, माती आणि माणूसकी जपा. शेती माती, झाडांशी दोस्ती करा, असा सल्ला हिंगोलीचे कवी गणेश आघाव यांनी विद्यार्थ्यांना दिला. भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील रा.धों.माध्यमिक विद्यालयात द्वारकाई व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शनिवारी गुंफण्यात आले. त्यात गणेश आघाव यांनी शेती मातीच्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर होते.

यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर संस्थेचे सचिव प्रमोद छाजेड, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, बालभारतीचे सदस्य डॉ.जगदीश पाटील, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर.आर.बावस्कर, मुख्याध्यापक एस.पी.चौधरी, कळस्कर सर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक राजेंद्र गवळी यांनी केले. उमेश नेमाडे यांनी या उपक्रमाचे महत्त्व प्रास्ताविकात मांडले. फिरती व्याख्यानमाला उपक्रम वेगळा ठसा उमटवणारा आहे. विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागण्यासाठी त्यातून नक्कीच मदत होईल. निरंतर दहा वर्षे या उपक्रमातील सातत्य पथदर्शी आहे, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.


पोरी शाळेत निघाल्या कवितेला दाद
कवी आघाव यांनी बालगाणी, बालगीते, कविता गायन करून विद्यार्थी व रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘झिम्म झिम्म पाणी आले, शिवार आपले भिजले’, ‘झाड झाले मोठे आता झाड झाले मोठे’ या कविता विद्यार्थ्यांना सोबत घेऊन म्हटल्या. किंबहुना या कवितेत आलेले संदर्भ त्यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले. ‘पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या’ या कवितेला भरभरून दाद व प्रतिसाद मिळाला.

जीवनात एक तरी कला जोपासा
आई ही मुलांसाठी संस्कार, जाणिवांचे बीज पेरून निघून जाते. काळाबरोबर चालायला ती शिकवते. ज्या विद्यार्थ्यांना मन बांधता येते तो आयुष्यात यशस्वी होतो. मन भटकवू नका. त्याला उच्च ध्येयाने बांधून ठेवा. जीवन जगताना एक तरी कला, छंद आत्मसात करा, असा सल्ला कवी आघाव यांनी दिला. द्वारकाई फिरती व्याख्यानमाला अभिनव आहे. महाराष्ट्रभर तिची जी चर्चा होते आहे त्यामागे आयोजकांची चिकाटी महत्त्वाची आहे, अशी शाब्बासकीची थाप त्यांनी मारली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !