भुसावळातील महेश नगर भागात चिखलामुळे रस्त्याची झाली घसरगुंडी

दररोज वाहनधारक होताय जखमी : पालिका प्रशासन बेदखल


भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील पालिका हद्दीत येणार्‍या तसेच हद्दीबाहेरील रस्त्यांवर पावसानंतर चिखल तयार झाला असून विस्तारीत भागात येणार्‍या या भागाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांसह वाहनधारक वैतागले आहेत. चिखलामुळे रस्त्यांवरच घसरगुंडी बनली आहे. आधीच खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मानपाठीचा त्रास सोसावा लागत आहे. त्यातच आता चिखलाचा त्रास यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. शहरातील महेश नगर, स्मशानभूमी ते डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम शाळेपर्यंतचा रस्ता चिखलमय झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वारंवार या संदर्भात तक्रारी करूनही प्रशासन बेदखल असल्याने नागरिकांच्या संतापात अधिक भर पडत आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गैरसोय
ताप्ती पब्लिक स्कूलच्या मागील बाजूस कचरा पडून असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. नवीन वाढीव वस्ती असलेल्या महेश नगर सिंधी बांधवांच्या स्मशानभूमीपासून तर खाजगी इंग्लिश मीडियम शाळेपर्यंतचा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला आहे. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालक दुचाकीवरून येतात तर काही पालक पायीच येतात. काही विद्यार्थी सायकलीने शाळेत येतात त्यांना रस्त्यावरून कठीण झाले आहे. अनेक वेळा चिखल अंगावर उडतो तर वाहनधारकदेखील घसरत आहेत. या रस्त्यावर कच टाकावा किंवा रस्ता तयार करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. याशिवाय खासगी शाळेच्या परिसरामध्ये घाण कचरा तुंबल्यामुळे नागरिकांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे, याची तत्काळ दाखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.


या भागात साचला चिखल
शहरातील जामनेररोडवरील पंढरीनाथनगर, साईदत्तनगर, सोमनाथनगर, गुलमोहर कॉलनीचा काही भाग, जळगाव रोडवरील साकेगाव ग्रामपंचायतीत येणारा काही भाग, राका नगरच्या पुढील साकरी रोडवरील भाग, शिवपूर कन्हाळेरोडवरील व्हीआयपी कॉलनी व परिसर आदींसह अन्य अनेक भागांमध्ये सध्या चिखल तयार झाला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !