रस्त्यांच्या कामासाठी ‘प्रहार’चे भर पावसात ठिय्या आंदोलन
अनिल चौधरींनी अधिकार्यांनाही बसविले खड्ड्यात : तत्काळ काम सुरू करण्याचे आश्वासन
‘Prahar’ protest for road works रावेर : रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यांची स्थिती अधिक बिकट होवून मोठ-मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री-मंगरूळ रस्त्यावर बुधवारी भर पावसात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलनाची दखल घेत अधिकार्यांना यावे लागले.
अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था कायम
रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडूजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होते. पिंप्री-मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून 1-1 फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहे. वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याने ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती.

भर पावसात खड्ड्यात केले आंदोलन
बुधवारी दुपारी भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी ग्रामस्थांना सोबत घेत थेट पिंप्री मंगरूळ रस्ता गाठला. पाऊस सुरू असतानादेखील खड्ड्यात त्यांनी आंदोलन पुकारले. काही आंदोलकांनी तर चिखलाच्या पाण्यात झोपा काढल्या. अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पावसात देखील आंदोलन चांगलेच पेटले.
अधिकार्यांनाही घ्यावी लागली दखल
आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अधिकारी त्याठिकाणी पोहचले. जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना देखील अनिल चौधरी यांनी जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी पाण्यात बसवले. अधिकार्यांनी वरिष्ठांशी बोलणे करून दिले असता तत्काळ रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे काम मार्गी लागल्यास केर्हाळा, अहिरवाडी, खानापूर, पिंप्री, मंगरूळ गावातील नागरिकांना फायदा होणार आहे.
आंदोलनात यांचा होता सहभाग
पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, उपसरपंच राकेश भंगाळे, संतोष बारी, रावेर युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वसीम शेख सचिन महाजन, योगेश पाटील, कृष्णा महाजन, राहुल महाजन, माजी उपसरपंच विकास पाटील आदींसह परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ सहभागी झाले.




