डीटीसी ब्रेकडाऊन मेंटेनन्स कामाच्या निविदा रद्द करा
सखोल चौकशी न झाल्यास वंचित आघाडीचा आंदोलन इशारा
Cancel DTC breakdown maintenance work tender भुसावळ : फेब्रुवारी 2024 मध्ये डीटीसी ब्रेकडाऊन मेंटेनन्स कामाच्या निघालेल्या निविदा तातडीने रद्द करून या निविदांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी केली आहे. या संदर्भात दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अनुभवी एजन्सींना केले अपात्र
निवेदनाचा आशय असा की, जळगाव सर्कलमधील विविध सात डिव्हिजनमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये एम्पनेलमेन्ट डीटीसी ब्रेकडाऊन मेन्टेनन्स कामाबद्दल निविदा काढण्यात आली मात्र या निविदेत गेल्या पाच वर्षापासून डीटीसी ब्रेकडाऊन मेन्टेनन्स काम करणार्या अनुभवी एजन्सीला अपात्र करून अनुभव नसलेल्या एजन्सींना पात्र करण्यात आले. मुख्यालयाचे नियम प्रत्येकासाठी सारखेच असताना एका डिव्हिजनने एका एजन्सीला पात्र केले तर दुसर्या डिव्हिजनने त्याच एजन्सीला अपात्र केले. महावितरण जळगाव सर्कलमध्ये सात डिव्हिजन येतात. सर्व सात डिव्हिजनमध्ये एम्पनेलमेन्ट डीटीसी ब्रेक डाऊन मेन्टेनन्स निविदा, हेड ऑफिसच्या नियमाप्रमाणे फेब्रुवारी 2024 मध्ये काढण्यात आल्या होत्या.

नियमांबाबत सोयीने काढला अर्थ
सर्व सात डिव्हिजनने एम्पनेलमेन्ट डीटीसी ब्रेक डाऊन मेन्टेनन्स कामामध्ये अनुभव असलेल्या चार एजन्सी सोडून ज्या सर्व एजन्सी पात्र केल्या त्यांना डीटीसी ब्रेक डाऊन मेन्टेनन्स कामांचा कुठलाही अनुभव नाही. त्यांचा केवळ डीटीसी प्रिव्हेंटिव्ह मेन्टेनन्स कामांचा अनुभव गृहीत धरण्यात आला. प्रत्येक डिव्हिजनने त्या हेड ऑफिसच्या नियमांचा सोयीचा अर्थ काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व बाबींचे गांभीर्य ओळखून त्वरित सर्व निविदा स्थगित कराव्यात तसेच या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 रोजी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार पवार व पदाधिकार्यांनी दिला आहे.
तक्रारीनंतर चौकशीचे आदेश
जळगाव महावितरणचे मुख्य अभियंता मुलाणी म्हणाले की, निवेदन प्राप्त झाले असून आपण नवीनच जिल्ह्यात बदलून आले असल्याने अधिक आपल्या सांगता येणार नाही मात्र या संदर्भात चौकशीचे आदेश अधीक्षक अभियंता महाजन यांना देण्यात आले आहे.




