भुसावळातील विजेची उधळपट्टी थांबणार : लवकरच 21 हजार पथदिव्यांना लागणार टायमर


Wastage of electricity in Bhusawal will stop: Timers will be required for 21 thousand street lights soon भुसावळ : शहरातील विविध भागातील सुमारे 21 हजार पथदिव्यांना पालिकेच्या माध्यमातून टायमर लावण्यात येणार असून पंधरवड्यातच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. शहरातील पथदिव्यांच्या माध्यमातून होणारी वीजेची उधळपट्टीला ब्रेक लागणार आहे. पालिकेच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जाणार आहे.

21 हजार पथदिव्यांना लागणार टायमर
शहरातील विविध भागात पालिकेचे सुमारे 21 हजार पथदिवे लावले आहे. विविध वॉर्ड, नगर, कॉलन्या, रस्त्यावरील दुभाजकांमध्ये लावलेले पोलवर पथदिवे दिवसादेखील सुरू राहत असल्याने विजेचा अपव्यय होत होता. यासाठी पालिकेकडून शहरातील पथदिव्यांना टायमर लावण्यात येत आहे. आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे तसेच वीज विभागाचे अभियंता व अन्य अधिकार्‍यांमध्ये बैठक होवून त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. शहरात पथदिव्यांना लावले जाणार्‍या टायमरची वेळ साधारत: संध्याकाळी 6.30 ते सकाळी 6.30 अशी ठेवली जाणार आहे. ऋतू पाहून ही वेळ ठरणार आहे. हल्ली शहरातील पथदिव्यांचे 110 पॉइंट बंद करण्यासाठी एक तासाचा वेळ लागत आहे. पावसात शॉक लागण्याची शक्यता असल्यने टायमर हे फायदेशीर ठरतील व यासाठी 10 लाखांचा खर्च होणार आहे.

मीटरवरील लोड कमी करणार
शहरात पथदिव्यांसाठी पालिकेचे 15 मीटर आहे. एका मीटरवर 350 ते 400 पथदिवे असल्याने लोड येवून अवेळवेळा पथदिवे बंद पडतात. शहरातील पथदिव्यांसाठी असलेली मीटरची संख्या ही दुप्पट केली जाणार आहे. 30 मीटर लावण्याचे नियोजन केले असून पथदिवे बंद पडण्याची प्रक्रिया बंद होणार आहे.

शिक्षक कॉलनीत केली चाचणी
पालिकेच्या माध्यमातून लावण्यात येत असलेल्या टायमरची चाचणी शहरातील शिक्षक कॉलनी भागातील एका पथदिव्यांवर करण्यात आली. तेथे टायमर लावून संध्याकाळी 6.30 सुरू कऱण्याची वेळ आणि पहाटे 6.30 बंद करण्याची वेळ सेट करण्यात आली व चाचणी यशस्वी झाली.

शहरात सुमारे 70 टायमर लावणार
शहरातील पथदिव्यांसाठी सुमारे 70 टायमर लावले जाणार आहे. एका टायमरवर 350-400 पथदिव्यांचे कंट्रोल राहणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यत शहरातील पथदिव्यांचा टायमर लावून ते कार्यान्वीत केले जाणार आहे, त्याचे नियोजन पालिकेने केले आहे.

असा होणार फायदा
शहरातील विविध भागात दररोज 24 तास चालणार्‍या पथदिव्यांची सुमारे संख्या ही 700 आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून विजेची होणारी उधळपट्टी थांबणार आहे मात्र आता पथदिव्यांना टायमर लावल्यावर दर महिन्याला सुमारे एक लाख रूपयांचे वीज बिल वाचणार असल्याचे पालिका वीज विभागाचे अभियंता पराग रूळे म्हणाले.


कॉपी करू नका.