वरणगावच्या एसआरपीएफ केंद्रासाठी 1380 नवीन पदांना मंजुरी
152 कोटी 23 लाख खर्चाला मान्यता : शासकीय अध्यादेश निघाला
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मंजूर असलेले राज्य राखीव पोलीस बलाचे प्रशिक्षण केंद्र आघाडीच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या जामखेड मतदार संघातील कुसडगाव येथे हलविण्यात आले होते. या प्रकरणी 5 जुलै रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत वरणगाव येथे पुन्हा राज्य राखीव पोलीस बलाच्या नवीन गट निर्माण करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी यासाठी एक हजार 380 नवीन पदे तसेच 152 कोटी 23 लाख रुपये खर्चाला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दिली.
1996 मध्ये मंजूर होते केंद्र
वरणगाव येथे युतीच्या काळात 1996 पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर होते. मात्र ते तांत्रिक दृष्ट्या अडचणीचे असल्याने 1999 मध्ये राज्य राखीव बल गटाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या केंद्राचे भूमिपूजनही केले. यानंतर पुन्हा हे केंद्र रखडले. यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट 19 च्या केंद्राला मान्यता देण्यात आली होती. यासाठी निधीही मंजूर केला होता. यानंतर राज्यात विधानसभा निवडणूक होऊन राज्यात महाआघाडीचे सरकार आले. या काळात जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे केंद्र पळविले. यामुळे भुसावळसह विभागात राजकारण पेटले होते. मात्र या सर्व प्रकरणी आमदार संजय सावकारे यांनी यशस्वी पाठपुरावा करुन 5 जूलै रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत वरणगाव येथे पुन्हा राज्य राखीव पोलिस बलाची नवीन तुकडी स्थापन करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाची मंजूरी मिळवली आहे. याच केंद्रासाठी गुरुवार, 1 ऑगस्टला झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत एक हजार 380 नवीन पदांना आणि 152 कोटी 23 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. यामुळे वरणगावात आता नव्याने राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी होणार आहे.

परिसराला असा होणार लाभ
राज्य राखीव बलाच्या स्थापनेमुळे तालुक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या सुविधा निर्माण होणार आहेत. भाजीपाला, दुग्ध व्यवसाय आदी पुरक व्यवसायांनाही गती मिळेल. वरणगावसह परिसरातील स्थानिकांनाही रोजगाराची संधी यामुळे उपलब्ध होईल.
जीआर निघाल्याने अन्याय दूर केला
जुन्या रखडलेल्या प्रकल्पाला उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली. प्रत्यक्ष जीआर निघाला असल्याने व्यापार, दळणवळणाला चालना मिळणार आहे. 1380 कर्मचारी, अधिकारी व प्रशिक्षणाला येणार यामुळे वरणगाव परिसरातील व्यापार वाढणार आहे. केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केली.




