रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदारांनी काढली  ई- पॉस मशीनची अंत्ययात्रा

  रावेर तहसीलदारांना दिले  निवेदन


रावेर (6 ऑगस्ट 2024) : शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारास धान्य वाटप करण्यासाठी मिळालेले अत्याधुनिक फाईव्हजी ई- पॉस मशीन सर्व्हर डाउन आणि तांत्रिक बिघाडामुळे कुचकामी ठरले आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांचे धान्य वितरण ठप्प झाले आहे. कार्डधारक आणि दुकानदार यांच्यात वाद होत असल्याने संतप्त स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवारी या ई-पॉस मशीनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी संघटनेबरोबर पाठिंबा म्हणून आमदार शिरीष चौधरी यांनीही मागण्या बाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले.

सर्व्हर डाऊनमुळे मनस्ताप
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारास धान्य वाटप करण्यासाठी मिळालेले अत्याधुनिक फाईव्ह जी ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे कुचकामी ठरले आहे. सुमारे 10 ते 15 दिवसापासून सर्व्हर सतत बंद असल्यामुळे दुकानदारांची वाटप थांबली आहे. त्यामुळे कार्डधारक आणि दुकानदार यांच्यामध्ये संघर्षांची परिस्थती निर्माण झाली आहे. वारंवार दुकानाच्या फेन्या मारल्यामुळे कार्डधारक आक्रमक झाले आहे. त्यामुळे दुकानदारांची मानसिक स्थिती खराव झाली आहे. सर्व्हर बंदच्या वारंवार त्रासाला कंटाळून रावेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी कुचकामी ठरलेल्या ई-पॉस मशिनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा वाजत-गाजत काढली.

यांनी दिले निवेदन
रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दुकानदारांकडील ई पॉस मशीनची अंत्ययात्रा स्वर्गरथातून काढण्यात आली. यात्रेचा समारोप तहसील कार्यालयात झाला.स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचेच्यावतीने आमदार शिरिष चौधरी यांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना मागणीचे निवेदन दिले. रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील, सल्लागार विठ्ठल पाटील, विलास चौधरी , मोहन महाजन, देविदास महाजन, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव दिलीप साबळे, सहसचिव निलेश महाजन, सदाशिव झांबरे, बी जी चौधरी, शहराध्यक्ष के एस शिंदे, महेंद्र बगाडे, प्रशांत वाणी, गोपाळ पाटील, सुधाकर पाटील, दुर्गादास चौधरी, भुषण सुरवाडकर यांचे सह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या आहेत मागण्या
इंटरनेट सेवा + सर्व्हर प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्यांत यावा, धान्य आहे परंतु इंटरनेट नाही व सर्व्हर अडचणीमुळे धान्य वाटप करता येत नाही. तेव्हा ऑफ लाईन पद्धत ही शासनात व प्रशासनास अगदी योग्य आहे. महागाईच्या निर्देशांकानुसार प्रती क्विंटल 300 रुपये कमिशन देण्यांत यावे. एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे परंतु तसे न होता अनेक वेळा वेगळा अंगठा घ्यावा लागत असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागते व वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहे. केवायसी साठी आम्ही शासनास मदत करीत आहोत. केवायसीचे प्रती व्यक्ती 50 रुपये स्वस्त धान्य दुकानदारास मिळावे. धान्य वाटपाची आफलाईन पध्दत कायमस्वरूपी सुरू ठेवावी.

 


कॉपी करू नका.