यावल शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी


यावल (7 ऑगस्ट 2024)  : सध्या पावसाळा असून सुद्धा यावल नगरपालिका शहरातील नळ धारकांना तीन दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. नगरपालिकेच्या साठवण तलावात मुबलक पाणी साठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा, अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडे केली आहे.

यावल शहरात होत असलेला पाणीपुरवठा हा हतनूर धरणाच्या पटचारीतून होतो. नगरपालिकेने बांधलेल्या साठवण तलावात पाणी साठवण्यात येऊन ते जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. जलशुद्धी केंद्रातून पाणी टाक्यांमध्ये जमा होऊन शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये हतनूर धरणामध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात असल्याने नियमित आवर्तन मिळण्यास उशीर होण्याची शक्यता गृहीत धरून शहराला त्यावेळी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला.


पालिका प्रशासनाला दिले पत्र
आत्ता पावसाळा सुरू होऊन महिना उलटला असून हतनूर धरण पूर्णपणे भरलेले आहे. पाटबंधारे विभागामार्फत धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जातो. नगरपालिकेच्या साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरवासीयांची होत असलेली मागणी व गैरसोय लक्षात घेऊन तातडीने पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात यावा, अशा मागणीचे पत्र माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्याकडे दिले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !