मैत्रेयच्या राज्यभरातील लाखो ठेवीदारांना मोठा दिलासा : मालमत्ता विक्रीतून लवकरच मिळणार ठेवींची रक्कम


Big relief for lakhs of depositors across Maitreya’s state: Deposits will soon be recovered from property sale मुंबई : मैत्रेय कंपनीत कोट्यवधींची गुंतवणूक केलेल्या राज्यभरातील लाखो ठेवीदारांना दिलासा मिळणारी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठेवी परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना आता ठेवी परत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सुमारे आठ वर्षांपासून प्रतीक्षेतील मैत्रेय कंपनीची मालमत्ता विक्री करण्याचे आदेश 5 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई न्यायालयाने दिले आहेत. मालमत्ता विक्रीनंतरच रक्कम आल्यानंतर ती ठेवीदारांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे.

मुंबई गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग
मैत्रेय उपभोक्ता एवम् अभिकर्ता असोसिएशन यांनी 2019 मध्ये औरंगाबाद खंडपीठातून कंपनीच्या 302 मालमत्ता विकून ग्राहकांना त्यांचे परतावे देण्याचा निकाल न्यायालयाकडून मिळवला होता तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कंपनीवर गुन्हे दाखल झाले. गुन्ह्याची वाढती व्याप्तीमुळे हे प्रकरण मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करून देण्यात आले. शासनाने यावर उपजिल्हाधिकारी, मुंबई यांची नेमणूक करून त्यांच्या नेतृत्वात मैत्रेय कंपनीची 400 पेक्षा अधिक मालमत्ता शोधून काढण्यात यश मिळविले.

धुळ्यात निघाला होता पहिला मोर्चा
कंपनीची मालमत्ता तातडीने विकून गुंतवणूकदार यांना त्यांच्या परताव्याची व्यवस्था करावी यासाठी 2016 पासून सर्वात पहिला मोर्चा पिंटूभाऊ दर्डा यांच्या नेतृत्वात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. त्यानंतर संपूर्ण राज्यात 2 ऑक्टोबर रोजी त्यावेळी आंदोलने करण्यात आली. शासन, प्रशासन,मंत्री महोदया यांना असोसिएशनकडून वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. प्रशासकीय स्तरावरदेखील पाठपुरावा केला होता. असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्यात व राज्या बाहेरील मालमत्ता जप्त करण्यात आली. सक्षम प्राधिकारी अधिकारी यांना या कामी मदत केली.

लाखो गुंतवणूकदारांना लवकरच मिळणार रक्कम
मुंबई उच्च न्यायालयाने 300 पेक्षा अधिक मालमत्ता विक्रीची परवानगी दिली असून उर्वरित मालमत्तेला टप्प्याटप्प्याने विक्रीचा आदेश मिळणार आहे. लाखो गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा असोसिएशनच्या प्रयत्नातून मिळणार असल्यामुळे गुंतवणूकदार यांना पैसा परत मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.

या सदस्यांच्या पाठपुराव्याला आले यश
गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी न्यायालयीन व प्रशासकीय स्तरावर पाठपुराव्यासाठी असोसिएशनचे पिंटू भाऊ दर्डा, भैय्यासाहेब माळी, उदय संख्ये, नानासाहेब पाटील, पंकज खैरनार, गणेश देशमुख, राजेश पाटील, दिलीप माळी, यासीन सय्यद, राजेंद्र देवरे, सुरेश खैरनार, राजेंद्र सुतार, ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप शिसोदे, सुभाष पाटील, मंगल परदेशी, डी.यू.पाटील, सुचित दुसाने, रामराव मोरे, पांडुरंग बनकर, ज्योती ठाकरे, चतुर देसले व असोसिएशन सदस्य यांनी मेहनत घेतली.


कॉपी करू नका.