जळगाव जिल्ह्यातही खेळाडूंना खेळातून करीअर करता यावे, यासाठी योजना राबविणार
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे : भुसावळात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा
भुसावळ (12 ऑगस्ट 2024) : देशाचा क्रीडा विभाग मोठा आहे. सध्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे खेळाडू चांगले यश मिळवत आहे. देशातील हरियाणा राज्यातील खेळाडूंचे प्रमाण अधिक आहे. ऑलिम्पिकमध्ये यश मिळविल्यानंतर खेळाडूंना राज्य सरकारकडून क्लास वन ऑफिसर दर्जाची सरकारी नोकरी मिळते, यामुळे उत्तर भारतातील पालक आपल्या पालकांना खेळात करीअरची संधी निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. याच धर्तीवर आपण जिल्ह्यातही खेळांतून करीअर करता यावे, यासाठी विविध योजना राबविणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा व युवा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी संतोषी माता सभागृहात झाला. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांचा सन्मान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार सावकारे, भाजपचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, अजय भोळे, किरण कोलते, मनोज बियाणी, नितीन धांडे आदींसह सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खडसे म्हणाल्या की, उत्तर भारतातील पालक आपल्या मुलांना खेळात प्राविण्य मिळावे यासाठीही प्रयत्न करीत आहेत. हेच प्रयत्न आपल्या भागातही व्हावे. संघटनेच्या माध्यमातून चांगले काम करता येण्यासाठी प्रयत्न करावे. विधानसभा निवडणूक झाल्याबरोबर नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणूक होतील. यामुळे या निवडणुकीचा परिणाम पुढील निवडणुकीवर पडतो. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्या ताब्यात येण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असेही त्यांनी सांगितले.

भुसावळात भाजपचाच आमदार होणार
आगामी काळात विधानसभेची उमेदवारी मलाच मिळेल, असे मी कधी म्हणत नाही मात्र उमेदवारी कुणालाही मिळो, भुसावळ मतदारसंघात भाजपचाच आमदार व्हायला पाहिजे. यासाठी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. भुसावळ तालुक्यासाठी अनेक विकासात्मक कामे केली आहेत. 541 कोटींच्या निधीतून ओझरखेडा धरणाच्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. 660 मेगावॅट प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे. 800 मेगावॅट प्रकल्पाची मागणी केली आहे. मतदार संघाच्या सर्वांगहीण विकासासाठी प्रयत्न केल्याचेही यावेळी आमदार सावकारे यांनी सांगितले.




