लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात
राणांच्या वक्तव्यानंतर सरकारचे डॅमेज कंट्रोल : तीन दिवस आधीच रक्कम आली खात्यात
Government’s damage control after Rana’s statement : Three days earlier, the amount came into the account मुंबई (15 ऑगस्ट 2024) : भाजपच्या मित्र पक्षाचे आमदार रवी राणा यांनी ‘निवडणुकीत ज्या बहिणी आशीर्वाद देणार नाहीत त्यांना योजनेतून दिलेले 1500 रुपये परत घेईन’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढून टिकांचा मारा सुरू होता. यानंतर सरकारने 17 ऑगस्ट ऐवजी तीन दिवस आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरूवात केली आहे. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली असून अन्य लाभार्थींना लवकरच लाभ मिळणार आहे.
सरकारकडून डॅमेज कंट्रोल
रवी राणा यांच्या वक्तव्याने सरकारच्या योजनेवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या तसेच शिंदे सेनेचे आमदार महेश शिंदे यांनीही डिसेंबरमध्ये छाननीत विरोधकांचे अर्ज बाद करू, असा धमकीवजा इशारा दिला होता. त्याचा विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची भीती सत्ताधार्यांना वाटू लागल्याने या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी सरकारने निर्धारित तारखेपेक्षा तीन दिवस आधी तातडीने पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला.

आधार लिंक नसल्याने 27 लाख महिला अजून वंचित
बँक खात्याशी आधार नंबर लिंक नसल्याने अर्ज केलेल्या 27 लाख 43 हजार 314 महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात बाद ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना योजनेचा पहिला हप्ता मिळू शकला नाही. आधार लिंक झाले की ही रक्कम त्यांना मिळणार आहे.




