नोकरीच्या आमिषाने मावस मेहुण्याने घातला पाच लाखांचा गंडा : नंदुरबारच्या तिघांविरोधात गुन्हा
Mother’s brother-in-law swindled 5 lakhs with the lure of a job: A case against the three of Nandurbar अमळनेर (16 ऑगस्ट 2024) : मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने नात्याने मावस मेहुणा असलेल्या संशयीताने अमळनेरच्या सेवानिवृत्त ग्रामसेवकाची पाच लाख 40 हजारात फसवणूक केली. नंदुरबार येथील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
मनोहर धोंडू पाटील (रा.पिंपळे रोड देशमुख नगर, अमळनेर) हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. जुलै 2021 मध्ये त्यांची मावस बहिण सीमा सुनील पाटील व तिचे पती सुनील विश्वासराव पाटील हे दोघे उसनवार पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी तुमचा मुलगा काय करतो असे विचारले. मुलगा बडोदा येथे कंपनीत आहे असे सांगितल्यावर त्यांनी आमची एचएएल कंपनीत ओळख आहे. त्याला तेथे नोकरी लावून देतो. त्यासाठी 15-16 लाख रुपये लागतील असे सांगितले.
आरटीजीएसने पाठवली रक्कम
मनोहर पाटील यांनी नातेवाईक आहेत म्हणून विश्वास ठेवून सुनील पाटील यांच्या सांगण्यावरून 26 ऑगस्ट 2021 रोजी त्यांचा मुलगा निखिल याच्या धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भालेर येथील शाखेच्या खात्यावर दोन लाख 50 हजार रुपये व त्यांची आई सुमनबाई विश्वासराव पाटील यांच्या खात्यावर दोन लाख 50 हजार आरटीजीएसने टाकले. त्यांनतर पुन्हा ऑर्डर काढण्यासाठी सुनील पाटील यांनी 40 हजार रुपये मागितले. त्याबदल्यात मनोहर पाटील यांचा मुलगा ललित पाटील यांच्या ईमेल वर एचएएल कंपनी ओझर नाशिकच्या नावाने बनावट आदेश यायचे व हजर होण्यापूर्वी पुढील तारीख देण्यात येत होती. पुन्हा लेखी पत्र आले मात्र त्याला नोकरी मिळालेली नाही म्हणून मनोहर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील, सुमनबाई व निखिल यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत