यावल शहरात सकल हिंदू समाज बांधवांनी काढला मोर्चा तर रावेर कडकडीत बंद
In Yaval city, all Hindu Samaj brothers took out a march while Raver was strictly closed यावल (16 ऑगस्ट 2024) : शहरात शुक्रवारी बांगलादेशात हिंदू समाज बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहर बंदची हाक देण्यात आली. आठवडे बाजारापासून ते शहरातील संपूर्ण दुकाने शंभर टक्के बंद होती तसेच सकल हिंदू समाज बांधवांनी एकत्र येत बुरूज चौकातून थेट तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले. बांगलादेशातील घटनेचा निषेध करीत तेथील हिंदू बांधवांना भारत सरकारकडून संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. व्यावसायिकांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवत 100 टक्के बंद पाळला. सकल हिंदू समाज बांधव बुरुज चौकात एकत्र आले व या ठिकाणी घोषणा देण्यात आल्या व नंतर तेथून मोर्चा काढण्यात आला व तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने दिनेश क्षिरसागर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक नितीन सोनार, रामभाऊ सोनवणे, डॉ.अभय रावते, भाजपा शहराध्यक्ष राहुल बारी, पुंडलिक बारी सह मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी झाले होते.
रावेर शहर कडकडीत बंद
रावेर : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत शुक्रवारी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यावसायीकांनी आपापली दुकाने बंद ठेवली तसेच बाजारही रद्द करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक कुटुंबावर, मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. रावेरमध्ये सर्व व्यापार्यांनी एकत्र येऊन हल्ल्याचा निषेध नोंदवत दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला. धार्मिक सौहार्द आणि शांतता टिकवण्यासाठी स्थानिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन शहरातील नेत्यांनी केले आहे. तहसीलदार बी.ए.कापसे व पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल शहराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सावदा शहरात शंभर टक्के बंद यशस्वी
सावदा : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर सावदा शहरातील व्यापारी व नागरिकांनी त्यास प्रतिसाद देत शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. यावेळी हिंदूवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. शुक्रवारी सकाळी गांधी चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध भागातून हा मोर्चा निघाल्यानंतर गांधी चौकात आल्यानंतर त्याचा समारोप करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, अॅड.कालिदास ठाकूर, अभय वारके, विक्की भिडे यांच्यासह शहरातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. सावदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. दिवसभर कडकडीत बंद असल्याने सदैव गजबजणारा बसस्थानक परिसर, इंदिरा गांधी चौक, संभाजी चौक आदी भागात शुकशुकाट जाणवला.
सिंगनूरला कडकडीत बंद
सिंगनूर ता.रावेर : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलेल्या आवाहनास दसनूर सिंगनूर येथील ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवून अत्याचाराचा निषेध नोंदवला.




