भगतसिंग, राजगुरू यांचा आदर्श बाळगून काम करा
आमदार संजय सावकारे : प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनी भगतसिंगांच्या जीवनावर नाटिकेचे सादरीकरण
Follow the example of Bhagat Singh, Rajguru भुसावळ (16 ऑगस्ट 2024) : शहिद भगतसिंग, राजगुरू यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असून त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श बाळगून त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करावा व त्यांच्या विचारांनी वाटचाल करावी, असे आवाहन भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी येथे केले.शहरातील संतोषी माता सभागृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित शहिद भगतसिंग यांच्या जीवनावरील नाटिकेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
शाहरूख, सलमान हे तर पडद्यावरचे नट
आमदार सावकारे आपल्या भाषणात म्हणाले की, शाहरूख, सलमान हे केवळ पडद्यावरचे नट आहेत तर शहिद भगतसिंग, राजगुरू यांच्या कार्याला तोड निश्चितच नाही ते खरे रीयल हिरो आहेत. आजच्या तरुणाईने त्यांचा आदर्श घेवून वाटचाल करावी, असेही ते म्हणाले. शहिद भगतसिंग यांच्या जीवनावर नाटिका सादर करणार्या स्थानिक कलावंतांनी दररोजच्या आपल्या कामाचा, नोकरीचा व्याप सांभाळून दर्जेदार नाटिका सादर केल्याने या कलावंतांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

भगतसिंगांचे योगदान स्मरणात ठेवा : पोलीस उपअधीक्षक
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी देशभक्ती प्रत्येकात गरजेची असून देशभक्त शहिद भगतसिंग यांचे योगदान आपण सर्वांनी नेहमीच स्मरणात ठेवावे. प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती असावी व आजूबाजूला घडणार्या घटनांकडे लक्ष असावे. एकमेकांमधील भेद संपवणे काळाजी गरज असल्याचे पिंगळे यांनी सांगत प्रतिष्ठा महिला मंडळाने राबवलेल्या उपक्रमाचे कौतूक केले.
शहिद कुटूंबासह देशसेवा बजावणार्यांचा सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहिद राकेश शिंदे यांच्या आई वीरमाता अनुसयाबाई काशिराम शिंदे, शहिद नरेंद्र महाजन यांच्या पत्नी अर्चना महाजन, जितेंद्र दिगंबर कोल्हे यांच्या पत्नी भारती कोल्हे, शेख उस्मान शेख बिसमिल्ला यांच्या पत्नी फरिदाबी शेख यांचा तसेच लष्करात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या निवृत्त लष्करी अधिकारी जगदीश सुभाष सावकारे, गंगाधर निंबाजी पगारे, गणेश श्रावण वासाने, किशोर रघुनाथ सनांसे, तुषार पाटील, जानकीराम सपकाळे आदींचा मंडळातर्फे सहृदय सन्मान करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
विचार मंचावर आमदार संजय सावकारे, भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, शहरचे उद्धव डमाळे, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी, इनरव्हील क्लबच्या राष्ट्रीय खजिनदार रश्मी शर्मा, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, भाजपा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, विकास पाचपांडे, नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
देशभक्तीवर गीतांना मिळाली दाद
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुनिधी, महेक आणि भूमिका आदींनी वंदे मातरम गीतावर नृत्याचे सादरीकरण केले. अनुष्का आंबेकर व राशि दिव्यांग मुलीने गाण्याचे सादरीकरण केले. जेष्ठ नागरिकांनी देशभक्तिवर आधारित सादरीकरण केले तर नंदनवन कॉलनीतील महिलांनीही सादरीकरण केले.
भगतसिंगांनी मृत्यूलाही आनंदाने कवटाळले : नाटिकेने उपस्थितांच्या अंगावर शहारे
पंजाब राज्यातील सरदार घराण्यात जन्मलेल्या भगतसिंग यांच्या बालपणापासून तर क्रांतीकारक होण्याचा प्रवास नाटिकेतून सादर करण्यात आला. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात भगतसिंग यांनी केलेल्या दोन शोर्य कार्यांमुळे वयाच्या 23व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. वयाच्या 23व्या वर्षी मृत्यूलाही भगतसिंगांनी आनंदाने कवटाळले या दृश्याने उपस्थितांच्या मनावर शहारे उमटले. नाटकात सर्व स्थानिक कलावंतांचा सहभाग होता. भगत सिंगाची भूमिका कुणाल छाबडा, सुखदेव नरेश रोहरा, राजगुरू सुमित पाचपांडे तर नरेशनची भूमिका खुशी लालवाणीने निभावली.

त्यागासह बलिदानाची कळावी माहिती : रजनी सावकारे
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. आजच्या पिढीला देशाचा इतिहास कळावा तसेच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या त्याग व बलिदानाची प्रत्येक नागरिकांना माहिती होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगत यापुढेही असेच उपक्रम राबवण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. सूत्रसंचालन राजेश्री देशमुख यांनी केले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




