एमपीएससी राज्यसेवा 2022 चे परीक्षार्थी अजूनही अंतिम निकालाच्या प्रतीक्षेतच


Candidates of MPSC Rajyaseva 2022 are still waiting for the final result जळगाव (16 ऑगस्ट 2024) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) दोन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालाची परीक्षार्थींना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एमपीएससीतर्फे ऑगस्ट 2022 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. यातून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आली. मुख्य परीक्षेमधून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती जानेवारी 2024 मध्ये घेण्यात आल्या. यानंतर 20 मार्च 2024 रोजी अंतरिम अर्थात प्रोव्हिजनल निकाल जाहीर करण्यात आला. यासंदर्भात काही महिला, खेळाडू व बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे काही प्रकरणे दाखल झाली होती. सद्यःस्थितीत न्यायाधिकरणाने सर्व प्रकरणे निकाली काढली आहेत.

623 पदांचा समावेश
अंतरिम निकाल लागल्यानंतर तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अद्यापही उमेदवारांना अंतिम निकाल व नियुक्तीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. यात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक राज्यकर आयुक्त, शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी यासह विविध 23 संवर्गातील 623 पदांचा समावेश आहे.

अधिकारी नैराश्याच्या गर्तेत : अंतीम निकालाची प्रतीक्षा
पूर्व परीक्षेपासून आजतागायत जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे मात्र अजूनही अंतिम निकाल तसेच नियुक्ती होण्यास किती कालावधी जाईल याबाबत अनिश्चितता आहे. तरुणाईला ऐन उमेदीची पाच ते सात वर्षे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी वाहून अपार कष्टातून निवड होऊनही नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. निवड झालेले बहुतांश अधिकारी हे बेरोजगार असून, त्यांना आर्थिक तसेच सामाजिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. नियुक्तीअभावी उद्याचा ‘अधिकारी’ नैराश्येच्या गर्तेत अडकला आहे. यास्तव यासंबंधी राज्यसेवा परीक्षा-2022 चा अंतिम निकाल प्रसिद्ध करून संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देवून या प्रकरणी तत्काळ पुढील कार्यवाही व्हायला पाहिजे, असे वाटते, असे नियुक्तीच्या प्रतीक्षेतील सहायक गटविकास अधिकारी युवराज किशोर मिरजकर म्हणाले.


कॉपी करू नका.