पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्ट रोजी जळगावात
पंतप्रधानांच्या उपस्थितीत ‘लखपती दीदी मेळावा’ मंत्री गिरीश महाजन यांनी केली जागेची पाहणी
Prime Minister Narendra Modi in Jalgaon on August 25 जळगाव (18 ऑगस्ट 2024) : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवार, 25 ऑगस्ट रोजी जळगावात येत आहेत. पीएम मोदी यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण जागेवर होत आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली.
यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते.





लाभार्थींना नाश्ता व जेवण
या मेळाव्यासाठी तालुका पातळीवरून येणार्या महिला लाभार्थ्यांना नाश्ता पुरविला जाणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. अवघे सात दिवस हातात असल्याने जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने या जेवणाच्या तयारीनिमित्त शुक्रवारी बैठक घेतली. त्यानुसार बुधवार, 21 रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. अवघ्या तीनच दिवसात एक लाख लाभार्थ्यांच्या नाश्ता व जेवणाची व्यवस्था करावी लागणार आहे.
जळगावात सव्वा दोन तासांचा दौरा
जळगावातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील विमानतळा समोरच्या मैदानावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने प्राथमिक नियोजनानुसार मोदी हे सव्वा दोन तास जळगाव दौर्यावर असतील. या मेळाव्यात खान्देशसह बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जळगाव विमानतळावरील प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लखपती दीदीं’शी संवाद साधतील. या दौर्यात ते नवी दिल्लीहून थेट जळगावला येणार आहेत. मेळाव्याला मार्गदर्शन केल्यानंतर ते नवी दिल्लीकडे रवाना होतील.
वाहतुकी संदर्भात नियोजन
शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने कराव्या लागणार्या उपाय योजनांसाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जामनेर मार्गावरची वाहतूक अन्य मार्गावर वळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
