धुळ्यातील लाचखोर वेतन अधीक्षिकेच्या घरात सापडले 32 लाखांचे घबाड
32 lakhs of money found in the house of a bribe-taking pay superintendent in Dhula धुळे (21 ऑगस्ट 2024) : थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा हप्ता अदा करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन अधीक्षक मीनाक्षी भाऊराव गिरी (41, अभियंता कॉलनी, वाडीभोकर रोड, गणपती मंदिराजवळ, धुळे मुळ रा.मु.पो.लोणी, ता.आर्णी, जि.यवतमाळ) यांना धुळे एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा एसीबीने त्यांच्या घराची झडती घेतली असता घरात सुमारे दहा लाखांची रोकड व 300 ग्रॅम सोने सापडल्याची माहिती एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी दिली.
उद्या न्यायालयात हजर करणार
धुळ्यातील शिक्षक दाम्पत्याचा एप्रिल 2022 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीतील थकीत वेतन व सातव्या वेतन आयोगाचा 3 व 4 हप्ता महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये मंजूर झाल्यानंतर तो अदा करण्यासाठी धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी यांनी मंगळवारी दोन लाखांची लाच मागितली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. सायंकाळी कार्यालयात लाच स्वीकारताच गिरी यांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिर झाल्याने गिरी यांना नोटीस बजावण्यात आली व बुधवारी त्यांना अटक करण्यात आली.





