उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्याचा बंद मागे : उद्धव ठाकरे
Tomorrow’s bandh canceled after High Court’s decision: Uddhav Thackeray मुंबई (23 ऑगस्ट 2024) : कोणत्याही राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली मात्र या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर शुक्रवारी याचिकेवर सुनावणी करताना हा बंद बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले.
बंदचे आवाहन बेकायदेशीर
बदलापूर अत्याचार प्रकरण आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ मविआकडून राज्यात शनिवारी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. हायकोर्टाने निर्णय जाहीर केल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसनेही हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे म्हटलं आहे.





तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध करणार
उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध होता. हायकोर्टाने तत्परतेने या बंदला मनाई केली आहे. न्यायालय तत्परतेने हालू शकते याचे मला कौतुक वाटते. मी आता कोर्टाकडून अपेक्षा करतो ज्या तत्परतेने तुम्ही निर्णय दिला तशीच तत्परता जे गुन्ह्यातील आरोपींबद्दल दाखवून त्यांना शिक्षा दाखवावी. हायकोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. पण कोर्टाचा आदर आम्हाला ठेवावा लागतो. याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जावू शकतो. पण तिथे जाणे आणि निकाल यायला वेळ लागतो. या बंदचे कारण वेगळं होतं. सुप्रीम कोर्टात जाण्याची ही वेळ नाही. तिथे गेल्यावर जनतेच्या मनातील उद्रेक उफाळला तर सगळ्यांना कठीण होईल. शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचे आवाहन केलं आहे. आम्ही बंद जरुर मागे घेत आहोत पण राज्यभर मविआचे नेते तोंडाला काळ्या फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन निषेध करणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
