नेपाळमध्ये बस अपघात : 25 भाविकांचे मृतदेह विशेष विमानाने जळगावात दाखल
जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील चौघा मंत्र्यांची उपस्थिती
Bus accident in Nepal: Dead bodies of 25 devotees brought to Jalgaon by special plane भुसावळ (24 ऑगस्ट 2024) : नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने बस कोसळून झालेल्या अपघातात 27 भाविकांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केंद्र व नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधल्यानंतर वायू दलाच्या विशेष विमानाने जळगाव जिल्ह्यातील 25 मृत भाविकांचे शव जळगाव विमानतळावर शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास आणण्यात आले. शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दहा रुग्णवाहिकेतून नातेवाईकांच्या उपस्थितीत हे मृतदेह भुसावळसह वरणगाव, तळवेल, दर्यापूर, सुकळी, ता.मुक्ताईनगर येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास हलवण्यात आले.
नियंत्रण सुटल्याने बस कोसळली
भुसावळ तालुक्यातील 90 भाविक पर्यटनासाठी अयोध्येसह नेपाळ दर्शनासाठी 16 ऑगस्ट रोजी गेले होते. गोरखपर्यंत ट्रेनने प्रवास केल्यानंतर गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसने भाविक पोखराहून काठमांडू जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली होती. शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता. या अपघातात गोरखपूरच्या चालक-वाहकासह जळगाव जिल्ह्यातील भुसावळसह परिसरातील 27 भाविकांचा मृत्यू ओढवला होता तर वरणगावातील तरुणी पाण्यात वाहून बेपत्ता झाली होती.





लोकप्रतिनिधींची उपस्थिती
जळगाव विमानतळावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, मंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, भुसावळ तहसीलदार नीता लबडे, भुसावळ मुख्याधिकारी महेश वाघमोडे, डॉ.केतकी पाटील, उज्वला बेंडाळे, कस्टम विभागाचे अधिकारी, आदींची उपस्थिती होती.
अपघातात ठार झालेल्यांमध्ये राजकीय क्षेत्रातील पदाधिकार्यांचा समावेश
पनेपाळ दुर्घटनेमध्ये ठार झालेले वरणगावचे माजी नगरसेवक सुधाकर जावळे हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक होते. ते दीर्घकाळ भाजपचे भुसावळ तालुकाध्यक्ष होते. त्यांनी खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी रोहिणी जावळे वरणगावच्या माजी सरपंच, नगरसेवक होत्या तर भुसावळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती अनिता अविनाश पाटील (रा.दर्यापूर ता.भुसावळ) यांचाही अपघातात मृत्यू झाला. तसेच वरणगाव आयुध निर्माणी क्रेडिट सोसायटीचे संचालक पंकज भागवत भंगाळे यांचाही मृत्यू झाला.
