वरणगाव-तळवेलची भोगावती ‘गहिवरली’ : नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार
नेपाळ बस दुर्घटनेने पाचही गावे शोकसागरात : 16 जखमींवर काठमांडूत उपचार
Varangaon-Talvel’s Bhogavati ‘deeply’: 25 dead in Nepal accident cremated भुसावळ (25 ऑगस्ट 2024) नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने बस कोसळून चालक-वाहकासह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मन हेलावणारा हा अपघात शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला होता. मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर वायुदलाच्या विशेष विमानाने 25 मृतदेह शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर दाखल झाले व तेथून 25 अॅम्ब्युलन्सद्वारे हे मृतदेह मयतांच्या मूळ गावी भुसावळसह तळवेल, वरणगाव, दर्यापूर, जळगाव व सुकळी, ता.मुक्ताईनगर येथे नेण्यात आले. रात्री उशिरा मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरणगाव शहरातून दहा तर तळवेल येथून एकाचवेळी सात जणांच्या अंत्ययात्रा निघाल्या. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूधारा तरळल्या. दरम्यान, अपघातात गोकर्णी सरोदे ही तरुणी पाण्यात बेपत्ता झाली असून अद्यापही तिचा शोध लागलेला नाही.






वरणगाव शहर काटेकोर बंद
भीषण अपघातात सर्वाधिक मृत भाविक हे वरणगावचे असल्याने शहरवासीयांनी शुक्रवारी दुपारनंतर व शनिवारी दिवसभर आपापली दुकाने बंद ठेवत मृतांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. वरणगावातील चार परिवारातील एकूण 13 जणांचा अपघात मृत्यू ओढवल्याने जावळेवाड्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी दिवसभर शहरातील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
आजी-माजी मंत्र्यांची वरणगाव-तळवेलला भेट
नेपाळ बस दुर्घटनेत वरणगावसह तळवेल भागातील सर्वाधिक भाविकांचा मृतयू ओढवला असून दोन्ही गावांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. शनिवारी दिवसभरात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, अॅड.रोहिणी खडसे यांनी संबंधित कुटूंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन करीत धीर दिला.
वरणगाव-तळवेलची भोगावतीही ‘गहिवरली’
शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेनंतर वरणगावसह तळवेल या दोन्ही गावात स्मशान शांतता पसरली आहे. शनिवारी दिवसभरात या गावांमध्ये अपघाताची चर्चा दिसून आली तर नागरिकांकडून टीव्हीसह सोशल मिडीयाच्या बातम्यांमधून बातमी जाणून घेण्यात येत होती. दिवसभर नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांकडून मृत कुटूंबियांच्या सदस्यांना धीर देण्याचे व सांत्वणाचे काम केले जात होते. शनिवारी रात्री उशिरा रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगावसह तळवेल येथे आणण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. रात्री उशिरा भोगावती नदीच्या काठावर अपघातातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वरणगावात बनवले दहा ओटे
वरणगावच्या स्मशानभूमीत एकाचवेळी सहा जणांवर अत्यसंस्कार करता येतात मात्र मृतांची संख्या पाहता पालिकेने तातडीने 14 ओट्यांचे काम हाती घेतले. अंत्यसंस्काराला होणारा उशीर पाहता स्मशानभूमीत जनरेटर व दिव्यांची व्यवस्था करण्यात आली.
25 मृतांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
नेपाळ बस अपघातात वरणगावचे दहा, तळवेलचे पाच, भुसावळचे पाच, जळगावचे तीन व सुकळी, ता.मुक्ताईनगर येथील एकाचा मृत्यू ओढवला आहे. रात्री उशिरा मृतदेह संबंधित गावात रुग्णवाहिकेद्वारे आणल्यानंतर काही वेळेत लागलीच अंत्ययात्रा काढण्यात आली. जळगावातील तिघांपैकी दोघा मृतदेहांवर तळवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली.
