महिला अत्याचार विरोधात कायदे कडक करणार : जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी
Will tighten laws against women abuse : Prime Minister Narendra Modi in Jalgaon जळगाव (25 ऑगस्ट 2024) : महिलांना घरात बसून ई एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत असून महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी जळगावातील लखपती दीदी मेळाव्यात संबोधीत करताना सांगितले.
मराठीतून भाषणाची सुरूवात
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. नेपाळ दुर्घटनेतील पीडित कुटुंबांच्या प्रती संवेदना व्यक्त केली. घटनेनंतर भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारशी संपर्क साधला. मंत्री रक्षा खडसे यांना नेपाळला जायला सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे पार्थिव विमानाने जळगावला आणण्याची व्यवस्था केली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. नेपाळ घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मोदी म्हणाले. घटनेतील पीडित कुटुंबांना केंद्र व राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल, अशा शब्दात त्यांनी धीर दिला.

पोलंडमध्ये संस्कृतीचे दर्शन
पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राचे संस्कार हे विश्वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्टियन लोकांचा सन्मान करतात. पोलंडमधील अनेक माता बहिणींना कोल्हापुरातील राज घराण्याने आश्रय दिला. जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे. महिलांना घरुण एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कडक कायदे करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
महिलांसाठीच्या योजना वाढवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता हे सर्व ट्रेलर आहे, यापुढे आम्ही महिलांसाठीच्या योजना वाढवणार आहोत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करत आहेत. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत, यातून नवीन विचार पुढे येईल असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मुलींसाठी बंदी असलेले क्षेत्र आम्ही आता सुरू करत आहोत. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठे बजेट ठेवलेले आहे.




