भुसावळातील साईचंद्र नगरात तीन घरे कोसळली : तीन कुटूंबासह 19 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

लाखो रुपयांचे नुकसान ः पालिकेच्या रिटेनिंग वॉलच्या दर्ज्यावरच उपस्थित झाले प्रश्नचिन्ह


भुसावळ (26 ऑगस्ट 2024) : शहरातील यावल रस्त्यावरील सर्वे क्रमांक 78 मधील साईचंद्र नगरात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे दुमजली तीन घरे कोसळल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सकाळीच रहिवाशांनी तीनही घरे खाली केल्याने जीवीतहानी टळली तर या घटनेत घर व त्यातील साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची दखल घेत तीनही घरातील तीन परिवारासह लगतच्या पद्मालय रेसीडेन्सीतील 19 नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात लोणारी समाज मंगल कार्यालयात हलवले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून घटनास्थळावरील मलबा हटवण्याचे काम केले जात आहे. अवघ्या काही वर्षांपूर्वीच घेतलेली घरे कोसळल्याने रहिवाशांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

संततधार पावसात रिटेनिंग वॉल तुटल्याने दुर्घटना
यावल रस्त्यावर सर्वे क्रमांक 78 ब मध्ये चंद्रशेखर अत्तरदे यांनी काही वर्षांपूर्वी साईचंद्र नगराची निर्मिती केली आहे. या नगरात सुमारे दिडशेहून अधिक परिवारांचे वास्तव्य आहे. शहराच्या उतारावर व तापी नदीजवळ वसलेल्या या नगरात सात वर्षांपूर्वीच 15 फूट उंच व अडीच फूट रूंद रुंदीची पालिकेने सुमारे एक कोटी रुपये खर्चातून रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधली होती मात्र पाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने पाणी तुंबले व त्यातच काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालिकेची रिटेनिंग वॉल रविवारी सकाळच्या सुमारास खचल्यानंतर तीनही दुमजली घरांना मोठा तडा गेला. स्थानिक रहिवाशांना याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने अत्यावश्यक सामान घराबाहेर काढत घर मोकळे केले. सुरूवातीला तीन घरे खचायला सुरूवात झाल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीनही दुमजली घरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सुदैवाने घरात कुणीही नसल्याने मोठी प्राणहानी टळली.


तीनही कुटूंब उघड्यावर
रुख्मिणी प्रवीण नरवाडे तसेच चंद्रकला रमेश दांडेकर-मनोज रमेश दांडेकर तसेच विराज चंद्रकांत चौधरी-विद्या चंद्रकांत चौधरी हा परिवार तीनही घरांमध्ये वास्तव्यास होता. काही वर्षांपूर्वी संबंधितांनी बँकेतून लाखो रुपयांचे कर्ज काढून ही घरे घेतल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. घर कोसळताच या कुटूंबियांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. प्रशासनाने तीन्ही घरातील कुटूंबियांची तात्पुरत्या निवार्‍यासह व जेवणाची सोय केली आहे.

लाखो रुपयांचे नुकसान
तीनही घरे कोसळल्याने रुख्मिणी नरवाडे यांचे कपाट, फ्रिज, रोख रक्कम, भांडे, घरगुती सामान, जीवनावश्यक वस्तू तसेच चंद्रकला दांडेकर यांचे एईडी टीव्ही, कपाट, कॉट, पाण्याच्या टाक्या तसेच जीवनावश्यक वस्तूंसह घरगुती सामान तसेच चंद्रकांत चौधरी यांचे यांच्या घरातील शिलाई मशीन, कॉट, पाण्याच्या टाक्या व घरगुती सामान मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले तर तीनही घरांचे मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

प्रशासनाची तातडीने धाव
साईचंद्र नगरात तीन घरे कोसळल्याचे वृत्त कळताच पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके व परवेज शेख, अभियंता रितेश बच्छाव, अभियंता शुभम विसपुते तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसह रेस्क्यूट टीमने धाव घेत पाहणी केली. शहर पोलीस प्रशासनातर्फे सहा.निरीक्षक निलेश गायकवाड, हवालदार फिरोज तडवी, हवालदार दीपक कापडणे, कॉन्स्टेबल भूषण चौधरी उपस्थित होते.

19 रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले
दुर्घटना घडलेल्या घरासमोर पद्मालय रेसीडेन्सीचा प्रवेशमार्गही खचल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून या अपार्टमेंटमधील 19 रहिवाशांना तात्पुरता शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात हलवण्यात आले आहे. त्यात एस.ए.गुप्ता, के.जी.बर्‍हाटे, एस.चक्रबोटी, जी.एस.साळुंके, जे.डी.बोरकर, एस.एस.तडवी, आर.एस.काटोले, डी.एस.व्यास, एस.एम.चव्हाण, एस.ए.सपकाळे, व्ही.आर.मुर्‍हेकर, ए.डी.तायडे, व्ही.एन.सोनवणे, ए.डी.सोनवणे, एन.बी.पवार, जी.आर.तडवी, आर.एम.तडवी आदींचा समावेश आहे.

रिटेनिंग वॉल तुटल्याने नुकसान : अत्तरदे
विकासक चंद्रशेखर अत्तरदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पालिकेने उभारलेली रिटेनिंग वॉल सततच्या पावसामुळे कोसळल्याने तीन्ही घरे कोसळली आहे. संततच्या पावसानंतर पावसाचा निचरा होवू न शकल्याने दुर्घटना घडली. सुमारे 15 वर्षांपूर्वीच आपण ले आऊट विक्री केला आहे. ज्या विकासकांनी घरे बांधली त्यांच्यासाठी पालिकेने संरक्षक भिंत बांधून दिली मात्र पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे भिंत कोसळल्याने घरेदेखील कोसळली, असेही अत्तरदे म्हणाले.

रिटेनिंग वॉलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
एक कोटी रुपये खर्चातून साईचंद्र नगरात वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काळात रिटेनिंग वॉल उभारण्यात आली मात्र या वॉलची उभारणी करताना तसेच रस्त्याचे अलीकडेच काँक्रिटीकरण करताना पाण्याचा निचरा करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना न झाल्याने रिटेनिंग वॉल कोसळली. कामाच्या दर्जावरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी नसल्यानेदेखील मोठी समस्या निर्माण झाल्याने पालिका प्रशासनानेच आता दखल घेण्याची अपेक्षा आहे.

रिटेनिंग वॉलच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
एक कोटी रुपये खर्चातून साईचंद्र नगरात सात वर्षांपूर्वी रिटेनिंग वॉल उभारण्यात आली मात्र या वॉलची उभारणी करताना तसेच रस्त्याचे अलीकडेच काँक्रिटीकरण करताना पाण्याचा निचरा करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना न झाल्याने रिटेनिंग वॉल कोसळली. कामाच्या दर्जावरही यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी नसल्यानेदेखील मोठी समस्या निर्माण झाल्याने पालिका प्रशासनानेच आता दखल घेण्याची अपेक्षा आहे.

दुर्घटनेनंतर तीन फिडरचा वीजपुरवठा खंडित
पसाईचंद्र नगरातील रिटेनिंग वॉलला लागून असलेली तीन घरे कोसळल्यानंतर मलब्याचा भाग वीज कंपनीच्या पोलवर पडताच शहरातील शांती नगर, गणेश कॉलनी, जळगाव नाका भागातील वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला. वीज कंपनीने तापी नगर फिडरवरून शांती नगरचा वीजपुरवठा सुरळीत केला तर गणेश कॉलनी व जळगाव नाका फिडर साकेगाव 33/11 केव्ही लाईनवरून जोडण्याचा प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

दुर्घटनाग्रस्त भागाचा मार्ग बंद
पदुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्या भागात बॅरीकेटींग करून रहिवाशांना जाण्या-येण्यास मनाई केली आहे.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !