शिवप्रेमी म्हणाले यांना माफी नकोच : आठच महिन्यांत राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा कोसळला
सिंधुदूर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते अनावरण झालेल्या मालवणच्या समुद्रकिनारावरील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी पाऊस सुरू असताना कोसळला. नौदल दिनाचे औचित्य साधून 4 डिसेंबर 2023 रोजी झाले होते मात्र 8 महिन्यांतच तो जमीनदोस्त झाल्याने देशभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. या कामाच्या दर्जावर आक्षेप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पुढे आली आहे.
युती सरकार संकटात
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. महाराष्ट्रात अशी दुर्घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. त्यामुळे याच मुद्यावर सरकारला टार्गेट केले जाईल. बदलापूरपाठोपाठ मालवण प्रकरणाने महायुती सरकारची प्रतिमा मलीन होण्याची शक्यता आहे. पुतळा उभारणीचे कंत्राट ठाण्यातील आर्टिस्ट्री कंपनीचे प्रमुख, शिल्पकार जयदीप आपटे यांना दिले होते. स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांनी काम पाहिले. या दोघांनी पुतळा उभारण्याचे काम निकृष्ट केले, अशी तक्रार बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी पोलिसात दाखल केली. त्यावरुन या दोघांवरही मालवण पोलिसात गुन्हा दाखल झाला.