नेपाळ बस अपघात : तिघा जखमींवर शनिवारी शस्त्रक्रिया : दोघांना डिस्चार्ज
अन्य दोन जखमींना काठमांडू येथून मुंबईत पोहोचले : ब्रीच कॅण्डीत उपचार
Nepal bus accident : Three injured underwent surgery on Saturday : Two discharged भुसावळ (29 ऑगस्ट 2024) नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान झालेल्या भीषण अपघातात 27 भाविकांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 16 भाविक जखमी झाले होते. काठमांडू येथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर सुरूवातीला सात जखमींना सोमवारी हॉस्पीटल प्रशासनाने डिस्जार्ज दिल्यानंतर मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले तर बुधवारी पुन्हा दोन जखमींना विमानाने मुंबईपर्यंत आणल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, तीन जखमींवर बुधवारी शस्त्रक्रिया होणार असलीतरी त्यांच्या हाताला असलेली सुज पाहता आता शनिवारी ही शस्त्रक्रिया होणार आहे तर भुसावळच्या दोन जखमींना मंगळवारी व बुधवारी डिस्जार्ज देण्यात आला.
सात जखमींवर मुंबईत उपचार
नेपाळ येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील सात जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी या जखमींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन विचारपूस केली. त्यांच्यासोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी या सदिच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गोलू पाटील, केदार ओक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
तिघा जखमींवर शनिवारी शस्त्रक्रिया
सात जखमींपैकी कुमुदिनी झांबरे, वर्षा भंगाळे, निलीमा भिरुड आदींचा हात फॅक्चर असल्याने तिघांवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता व बुधवारी ही प्रक्रिया होणार होती मात्र जखमींच्या हाताला आलेली सूज पाहता जखमींवर आता शनिवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
भाजपा पदाधिकारी ठरताय देवदूत
मुंबईतील जखमींसोबत भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गोलू पाटील तर काठमांडू येथील जखमींसोबत भाजपा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, केदार ओक, अतुल झांबरे थांबून आहेत. अहोरात्र हे पदाधिकारी रुग्ण सेवेसाठी झटून आहेत.
दोन जखमींना डिस्जार्च
अपघातातील सात जखमींपैकी सुनील धांडे (श्रीहरी नगर, भुसावळ) यांना मंगळवारी डिस्जार्च दिल्यानंतर रेल्वे त्यांना भुसावळला रवाना करण्यात आले तर भारती पाटील (गणेश कॉलनी, भुसावळ) यांनादेखील बुधवारी रुग्णालय प्रशासनाने डिस्जार्ज दिल्यानंतर त्यांना रेल्वेने रवाना करण्यात आले.
विमानाने दोन रुग्ण मुंबईत
नेपाळ दुर्घटनेतील 16 जखमींपैकी 9 जखमी अद्यापही काठमांडू येथे उपचार घेत आहेत. त्यातील दोन जखमी अविनाश भागवत पाटील (दर्यापूर, 54) व शारदा सुरेश पाटील (52, आचेगाव) यांना बुधवारी मुंबईत विमानाने सायंकाळी आणल्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. राज्य सरकारतर्फे या सर्व जखमींना सर्वेतोपरी मदत करण्यात येत असून, विधी व न्याय विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर दिली आहे.
सर्व जखमींवर विनामूल्य उपचार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृह विधी व न्याय विभाग राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या धर्मदाय रुग्णालय कक्षाच्या माध्यमातून सर्व रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्यात येत असल्याचे
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष धर्मदाय विभागाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले.