महायुतीला साथ द्या : लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही : अजित पवार
नागपूर (31 ऑगस्ट 2024) : तुम्ही फक्त महायुतील साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला मिळतीलच मात्र नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होईल. आम्ही तिघे कुठे धनुष्यबाण, कुठे कमळ, तर कुठे घड्याळ या चिन्हावर 288 जागांवर उभे राहू. त्यावेळी तुम्ही महायुतीला भरभरून मतदान करा. मी शब्द देतो, ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष सुरू ठेवू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या दुसर्या टप्प्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
अडीच कोटी महिला या योजनेचे उद्दिष्ट
अजित पवार म्हणाले, आम्ही वचन पाळणारे लोक आहोत आणि वचनपूर्ती करणारे हे सरकार आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अडीच कोटी महिलांना या योजनेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. आता या योजनेत जवळपास 1 कोटी 60 लाख बहिणी लाभार्थी झाल्या आहेत. पुढचे टप्पेही लवकरच होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काहीही झाले तरी योजना सुरूच राहणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या बहिनींनो जो पर्यंत तुमचा देवा भाऊ तो पर्यंत चिंतेचे कारण नाही. अरे हाय कोर्टमध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू. आम्हाला या राखीची आण आहे काहीही झाले तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. आम्ही प्रयत्नांची शर्थ करून हाय कोर्टात केस लढवू. पण भगिनींनो यांची नियत समजून घ्या, आज कुठे बहीणींच्या खात्यात पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागले आहे, अशी टिका त्यांनी केली.




