मुसळधार पावसाचा कहर : गुजरातमध्ये नागरिकांचा मृत्यू
Heavy rains wreak havoc : 49 people died in Gujarat अहमदाबाद (5 सप्टेंबर 2024) : गुजरात राज्यात पावसाने हाहाःकार उडवला असून आतापर्यंत राज्यात पावसामुळे 49 जणांचा मृत्यू ओढवला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. संततच्या पावसामुळे पिकेही पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
118 टक्के पाऊस
पोरबंदर, जुनागढ, कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि जुनागड या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांना मोठा फटका बसला आहे. जिथे अनेक दिवस पुराने कहर केला आहे. पुरामुळे रस्ते आणि शेतीचं नुकसान झालं आहे. वडोदरा आणि इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे घरांचंही मोठं नुकसान झालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत गुजरातमध्ये 118 टक्के पाऊस झाला आहे.
राज्यात 49 जणांचा मृत्यू
गुजरातमधील कच्छमध्ये सर्वाधिक 180 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर गुजरातमध्ये सर्वात कमी 94 टक्के पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या काळात वीज पडणे, भिंत कोसळणे, बुडून मृत्यू अशा अनेक घटना घडल्या असून त्यात 49 जणांचा मृत्यू झाला आहे.
37 हजार नागरिक सुरक्षितस्थळी
एनडीआरएफच्या 17 तुकड्या, एसडीआरएफच्या 27 तुकड्या आणि लष्कराच्या 9 तुकड्यांव्यतिरिक्त हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या तुकड्याही राज्यात तैनात करण्यात आल्या. आतापर्यंत 37 हजारांहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. 42 हजार 83 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच 53 लोकांना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.